तिच्या कष्टाचे चीज झाले, एका बापाला अजून काय पाहिजे...

आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र टेनिसचे सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा भोसलेच्या वडिलांची प्रतिक्रिया

    02-Oct-2023
Total Views |
 
gold
 
 
पुणे, 1 ऑक्टोबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
तिच्या कष्टाचे चीज झाले... एका बापाला अजून काय पाहिजे... अशी प्रतिक्रिया आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक विजेत्या ऋतुजा भोसले हिचे वडील आणि पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांनी व्यक्त केली. पुण्याची असलेल्या ऋतुजाने शनिवारी भारताला रोहन बोपण्णासह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवून दिले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऋतुजाने सुवर्णपदक मिळविल्यानंतर भोसले कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. त्यांना दिवसभर अभिनंदनाचे दूरध्वनी येत आहेत. पोलिस अधिकारी असलेले तिचे वडील संपतराव भोसले यांनी आंनद व्यक्त केला. ते म्हणाले, ‌‘वयाच्या नवव्या वर्षापासून ती टेनिस खेळत आहे. 2018च्या आशियाई स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
 
तेव्हा पदकापासून ती दूर राहिली होती. आज तिला सुवर्णपदक मिळाले आहे, तिच्या कष्टाचे चीज झाले, एका बापाला आणखी काय हवे. आनंद वाटत आहे.' ऋतुजा ही पुण्यातील बाऊन्स टेनिस ॲकॅडमीमध्ये केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. प्रशिक्षक शहा यांनीदेखील ऋतुजाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, आमच्या ॲकॅडमीच्या दृष्टीने हा अभिमानास्पद दिवस आहे. सहा महिन्यांपासून आम्ही खेळताना मानसिक स्वास्थ्य कायम कसे राहील, यावर भर दिला होता. त्याचा परिणाम हा उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या सामन्यातील तिचा खेळ पाहून लक्षात आला. तीन वर्षांपासून मी तिला मार्गदर्शन करीत आहे. तिचा खेळ आता परिपक्व खेळाडूप्रमाणे होत आहे.