गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी लवकरच बैठक

    09-Jan-2023
Total Views |
 
 
सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
 

Housing 
 
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाबाबत नगरविकास, महसूल आणि सहकार या तिन्ही खात्यांची एकत्रित बैठक बाेलवावी, अशी मागणी राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.त्यावर लवकरच अशी बैठक घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने राज्यातील नाेंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने 13 सप्टेंबर 2019 राेजी शासन निर्णय घेतला आहे.त्यानुसार अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, गेली तीन वर्षे या नियमांची काेणतीही अंमलबजावणी झालेली नाही. या विषयात शासनाने नगरविकास, महसूल आणि सहकार विभाग संबंधित असल्याने त्यांची एकत्र बैठक आयाेजित करून पुन्हा 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देणे आवश्यक आहे.
 
त्यासाठी या तीन खात्यांची एकत्रित बैठक बाेलावून फेडरेशनबराेबर चर्चा करावी, असे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना फेडरेशनकडून देण्यात आले, अशी माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी दिली.राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्याशी या विषयावर आम्ही चर्चा केली. या संस्थांना स्वयंपुनर्विकास करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही अनास्कर यांनी दिली. तसेच, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. सर्व वित्तीय संस्थांची बैठक घेण्यात येईल आणि याेग्य त्या सूचना देण्यात येतील, असे मराठे यांनी सांगितल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली.