बारा वर्षीय रुद्रेश्वरकडून रॅपलिंगने जलाशय पार करण्याचा विक्रम

    30-Sep-2022
Total Views |
 

Rapling 
 
एका 12 वर्षांच्या मुलाने वर्ल्ड रेकाॅर्ड केले.केवळ 7 मिनिटे आणि 2 सेकंदांच्या विक्रमी वेळेत 103 मीटर (337 फूट) उंचीवरून त्याने रॅपलिंगद्वारे जलाशय पार केला. त्याच्या या विक्रमाची नाेंद नुकतीच नाेबल बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या साहसी मुलाचे नाव आहे आर. रुद्रेश्वर.हा विक्रम चेन्नईच्या तांबरमजवळील मुदिचूर येथे झाला. रुद्रेश्वर हा सलमंगलम, चेन्नई येथील वेलमल विद्याश्रम या सीबीएसई शाळेतील 7 व्या वर्गातील विद्यार्थी आहे. ताे 5 वर्षांचा असल्यापासून गिर्याराेहणाचे प्रशिक्षण घेत आहे. तेव्हापासून त्याने अनेक विक्रम केले आहेत. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने चेन्नईच्या मालापट्टूमध्ये 151 फूट उंचीच्या डाेंगरावरून रॅपलिंग करण्याचा विश्वविक्रम केला.आफ्रिकेतील सर्वात उंच असलेल्या 5 हजार 895 मीटरच्या माऊंट किलाेमांजराे या पर्वतावर 3 हजार 720 मीटरपर्यंत चढाईही त्याने वयाच्या 7 व्या वर्षीच केली आहे; तर वयाच्या 8 व्या वर्षी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील अराकू येथील कटिका धबधब्यात 400 फूट रॅपलिंगद्वारे खाली उतरण्याचा विक्रम देखील केला आहे.
 
तामिळनाडू पर्वताराेहण संघटनेचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण तसेच वडिलांच्या पूर्ण पाठिंब्यामुळेच रुद्रेश्वरने हा विश्वविक्रम केला. रुद्रेश्वरचे वडील एसव्ही रमणा हे तामिळनाडू पर्वताराेहण संघटनेचे संयुक्त सचिव आणि पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी आहेत. ते एक प्रभावी ट्रॅक रेकाॅर्ड असणारे गिर्याराेहक देखील आहेत. त्यांनी जमैकाच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून पर्वताराेहण विषयात डाॅक्टरेट मिळवली आहे.तामिळनाडूतील मलापट्टू पर्वतरांगांमध्ये डाेळ्यांवर पट्टी बांधून 155 फूट उंचीवरून खाली उतरण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. यासह लडाखमध्ये 18 हजार 880 फूट वेगाने ट्रेकिंग आणि अराकू (आंध्र प्रदेश) येथील कटिका धबधबा 400 फूट खाली उतरण्याचा आणखी एक विक्रम त्यांच्या नावे आहे. रुद्रेश्वर त्याच्या वडिलांसाेबत ट्रेक आणि पर्वत चढण्यासाठी जात असे, ज्यामुळे त्याला साहसी खेळांची आवड निर्माण झाली. त्याची आवड पाहून पालकांकडून या खेळात उतरण्यासाठी त्याला प्राेत्साहन मिळाले.
 
रुद्रेश्वरच्या या विक्रमाबाबत बाेलताना, त्याच्या पालकांनी सांगितले, की प्रत्येक मूल अद्वितीय आहे आणि त्याच्याकडे अद्वितीय आवड, प्रतिभा आणि काैशल्ये आहेत. केवळ आपण ती ओळखणे आणि त्याला त्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करणे आवश्यक आहे. मुलांना त्यांच्या ध्येयापासून विचलित हाेऊ न देणे आणि त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेचा सन्मान करणे ही त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यात खूप महत्त्वपूर्ण आहे.रुद्रेश्वर इतक्या लहान वयात जे काही साध्य करू शकला त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्याचे पालक म्हणाले.रुद्रेश्वर गिर्याराेहणाव्यतिरिक्त बुद्धिबळ, स्केटिंग, धनुर्विद्या, सिलंबम आणि याेगामध्येही निपुण आहे.
त्याची स्वप्नपूर्ती काय आहे असे विचारले असता त्याने सांगितले, की त्याला एव्हरेस्ट शिखरावर चढाई करायची आहे.