आयटी क्षेत्रातील आगामी काळ मूनलायटिंगचा

    30-Sep-2022
Total Views |
 
 
 
संध्यानंद.काॅम
 

IT 
 
गरजा वाढल्या की त्यांच्या पूर्ततेसाठी कमाई जास्त करावी लागते. मग काेणी नेहमीच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामे करून पैसा मिळवायला प्रारंभ करतात. एका कंपनीत कर्मचारी म्हणून काम करतानाच दुसऱ्या कंपनीचे काम करण्याच्या या पद्धतीला ‘मूनलायटिंग’ म्हणतात. आयटी क्षेत्रात उघड झालेल्या अशा काही घटनांमुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एका कंपनीत असताना दुसरीचे काम करणे अयाेग्य असल्याचे काहींना वाटते, तर हा आगामी काळातील ट्रेंड असल्याचे काहींचे मत आहे. ‘विप्राे’चे प्रमुख रिशद प्रेमजी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे हा मुद्दा चर्चेत आला. ‘मूनलायटिंग’ म्हणजे सरळसरळ विश्वासघात असल्याचे स्पष्ट मत रिशद यांनी व्यक्त केले असून, या प्रकाराला ‘इन्फाेसिस’नेही विराेध केला आहे. पण, कंपनीवर थेट परिणाम हाेत नसेल, तर कर्मचारी त्यांच्या फावल्या वेळेत काय करतात याच्याशी कंपनीचा संबंध नसल्याचे ‘स्विगी’चे म्हणणे आहे.
 
एकच व्यक्ती एकाच वेळी सात वेगवेगळ्या नाेकऱ्या करत असल्याची घटना बंगळुरूमध्ये नुकतीच उघडकीस आली. या व्यक्तीची भविष्य निर्वाह निधीची एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. बंगळुरूमधीलच बहुराष्ट्रीय कंपनीतील बारा काेडिंग कर्मचारी ‘मूनलायटिंग’ करताना सापडले.‘मूनलायटिंग’च्या घटना जास्त करून आयटी क्षेत्रात आढळल्या आहेत. कामगिरी आणि वेतनाच्या मुद्द्यावर जाेपर्यंत कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना समाधानी ठेवू शकत नाहीत, ताेपर्यंत त्यांना असे करण्यापासून राेखता येणे अवघड असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातच काेराेना काळात घरून काम करण्याच्या पद्धतीमुळे रिमाेट वर्किंग आणि हायब्रिड वर्क कल्चरमुळे हा ट्रेंड वाढल्याचे हे तज्ज्ञ सांगतात.हे याेग्य की अयाेग्य? आयटी उद्याेगातील माहीतगारांच्या म्हणण्यानुसार, हा मुद्दा पूर्णपणे विश्वासाबराेबर संबंधित आहे. ‘आयआयडी’चे वरिष्ठ उद्याेग सल्लागार सुशांत शर्मा म्हणतात, ‘भारतात सुमारे 99 टक्के नियाेक्ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना अर्धवेळ काम करण्याची परवानगी देत नाहीत. पण, तेही पूर्णपणे कंपनीवर अवलंबून असते.
 
आशिया आणि आफ्रिकेतील बहुतेक देशांत कामाचे तास जास्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसाेटी लागते. मात्र, काेणी आपल्या काैशल्याचा अधिक वापर करू इच्छित असेल, तर त्यात वाईट काही नाही.’ करिअर तज्ज्ञ आणि समुपदेशक गाैरव त्यागी यांच्या मते, प्रायमरी जाॅब आणि छंद अशा दाेन प्रकारांत याचे वर्गीकरण करता येते. परदेशांत असे चालते. तेथे आंत्रप्युनर लाेक एकाच वेळी अनेक व्यवसाय करू शकतात, तर मग कर्मचाऱ्यांवर बंदी कशाला? तर्क काय सांगताे? एकाच क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करण्यामुळे गुप्त माहिती धाे्नयात येऊ शकते. दुसरीकडे, जास्त कमाई करण्याच्या नादात संबंधित कर्मचारी त्याच्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष करण्याची श्नयता असते. त्याला त्याच्या कामाच्या तासांचे पैसे मिळत असूनही त्याचे कामाकडे दुर्लक्ष हाेते.
 
आपल्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम करणे हेसुद्धा अयाेग्य मानावे लागेल. पण, एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या फावल्या वेळेचा वापर त्याचे काैशल्य वापरून जास्त कमाईसाठी करू नये ही कंपन्यांची अपेक्षाही तर्कनिष्ठ वाटत नाही. कंपन्या ऑफिसच्या कामासाठी घराचा वापर करण्यास परवानगी देत असतील, तर नियाे्नत्या कंपनीच्या कामाशिवाय अन्य काेणाचे काम करण्यास प्रतिबंध करण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक कामाबाबत कंपनीला माहिती देणे हा खासगीपणाच्या हक्काचा भंगही हाेताे. एखाद्या कंपनीकडून नियमित वेतन, भत्ता आणि अन्य सुविधा घेणारा कर्मचारी जेव्हा अन्य कंपन्यांसाठी काम करणे सुरू करताे तेव्हा हा प्रकार ‘मूनलायटिंग’मध्ये येताे. वेतनाच्या माेबदल्यात कर्मचारी ठरलेल्या वेळेत काम करतात आणि फावल्या वेळेत दुसरे काम करतात. काळाबराेबर कंपन्यांच्या अपेक्षा बदलल्या असून, आता वीकेंडलाही काम करावे अशी अपेक्षा केली जाते.