नकारात्मकता टाळा, आयुष्य समाधानाने जगा

    29-Sep-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 
 

happy 
जीवन म्हटल्यावर सगळे काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. अपयशालाही सामाेरे जावे लागते आणि अनपेक्षित समस्यांना ताेंड द्यावे लागते. जीवनात काही काळ असा येताे, की सगळेच प्रतिकूल घडत जाते. या स्थितीत नैराश्य येणे साहजिक असले, तरी हार मानून कसे चालेल? सर्व अडचणींवर मात करून पुढे जात राहण्यालाच जीवन म्हणतात.आनंदी आणि समाधानी राहणे आपल्याच हातांत असते.मन आणि हृदय खुले असेल, तर तसे राहता येते. पण सभाेवतालच्या स्थितीवर आपले नियंत्रण नसते हेही खरे.प्रसारमाध्यमे रात्रंदिवस काेणती ना काेणती महामारी, युद्धे, पर्यावरणातील बदलांमुळे हाेणारे दुष्परिणाम, गाेळीबार असल्या नकारात्मक बातम्यांचा भडिमार करत असताना संताप आणखी वाढताे. किशाेरवयीनांमध्ये नैराश्य, घरगुती हिंसाचार आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.
 
या सगळ्यांचा वाईट परिणाम आपल्या जीवनाबराेबरच आराेग्यावरही हाेताे आहे. यात एक चूक आपल्याकडूनही हाेते. आपण रागाला धरून बसताे.आपल्या निकटवर्तीयांवरील रागाचा परिणाम आपल्यावरही हाेताे. भावनेच्या रूपाने आपली प्रतिक्रिया व्यक्त हाेते.राग, नैराश्य आणि चिंता आपल्या शारीरिक-मानसिक आराेग्यासाठी धाेकादायक असल्याचे कायम लक्षात ठेवा. मनात सततच्या नकारात्मक भावनांचा परिणाम शरीरावर हाेत असल्याचे आता शास्त्रीय कसाेट्यांवर सिद्ध झाले आहे. कर्कराेग, स्मृतिभ्रंश, हृदयविकार, पक्षाघात आणि मधुमेहासह अन्य काही विकारांमागे तणाव हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. काेणताही विकार एकदम हाेत नसताे, तर त्याची काही लक्षणे दिसायला लागतात आणि वेळीच त्यांची दखल घेतली नाही तर ते गंभीर स्वरूप धारण करतात.
 
तुम्हाला त्या विकारांपासून दूर राहावयाचे असेल, तर आधी तुम्हाला सभाेवतालच्या स्थितीकडे बारकाईने पाहू समाधानी राहायला शिकले पाहिजे. तुम्ही प्रेम, करुणा, आनंद आणि समाधान या भावनांकडे जास्त लक्ष दिलेत, तरी काही विकारांची जाेखीम टाळता येऊ शकते.प्रेम हा अनेक विकारांवरचा उपचार असल्याचे आपण ऐकलेले असते आणि त्यामागे एक जैविक-रासायनिक कारण आहे. प्रेमाच्या अभिव्यक्तीमुळे तणाव दूर हाेत असल्याचे मेंदूच्या स्कॅनिंगमध्ये दिसले आहे. आपल्याला समाधानी आयुष्य हवे असेल, तर दया आणि सहानुभूती या भावनांकडे लक्ष केंद्रित करायला हवे. सॅन दिएगाेमधील कॅलिफाेर्निया विद्यापीठातील न्यूराेसायन्सेस विभागाचे प्रमुख विल्यम माेब्ले म्हणतात, की इतरांचे म्हणणे ऐकून घेणे आणि सहानुभूती दाखविणे हा त्यासाठीचा एक चांगला मार्ग आहे.
 
तुम्हाला रस्त्यात एखादी चलनी नाेट पडलेली दिसली, तर ती एखाद्या गरजवंताला द्या. दयेच्या भावनेमुळे मेंदूतील ‘ऑ्निसटाेसिन’ या संप्रेरकाची पातळी वाढते. याला ‘प्रेमाचे संप्रेरक’ (लव्ह हार्माेन) म्हणतात. त्यामुळे रक्तदाब कमी हाेऊन सामाजिक संबंध दृढ हाेण्यास मदत हाेते. ‘डाेपामाइन’ या संप्रेरकामुळे इतरांना मदत करण्याची तयारी, उत्साह आणि स्फूर्ती मिळते आणि‘सेराेटाेनिन’ या संप्रेरकामुळे मूड सुधारताे.त्यामुळे प्रेमाची भावना जागृत करणे हा चांगला उपाय असल्याचा विल्यम माेब्ले यांचा सल्ला आहे.
 
तणाव कमी करा : सततच्या तणावामुळे ‘काेर्टिसाेल’ या संप्रेरकाची पातळी वाढून शेवटी पेशींचे नुकसान व्हायला लागते. त्यामुळे सूज येऊ लागून जळजळ सुरू हाेते.ते टाळण्यासाठी पहाटे पाच मिनिटे ध्यान करा, बाहेरच्या माेकळ्या हवेत लांबवर फिरून या, हसवणारे विनाेदी कार्यक्रम पाहा, रविवारी अथवा तुमच्या सुटीच्या दिवशी कुटुंबीयांबराेबर भाेजन घ्या. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे, तर आपले आराेग्य जपणारी यंत्रणा विकसित करा.
 
चांगले संबंध ठेवा, एकटेपणा टाळा : सतत एकटे राहणे किंवा एकाकीपणा वाटण्यातून तणाव वाढत असल्याचे मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. डग्लस नेमसेक यांनी स्पष्ट केले आहे. सतत एकटे राहण्यामुळे हाेणाऱ्या दुष्परिणामांची तुलना त्यांनी दिवसभरात 15 सिगारेट ओढण्याबराेबर केली आहे. एकटेपणामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताची जाेखीम वाढत असल्याचे 34 लाख लाेकांबाबत केलेल्या विविध 70 अभ्यासांतून समाेर आले आहे. अशा लाेकांना अकाली मृत्यू आणि स्थाैल्याचा धाेकाही असताे. पण, चांगले सामाजिक संबंध असलेल्यांना आणि एकाकी नसलेल्यांबाबत ही जाेखीम निम्म्याने कमी हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
माेकळेपणाने कृतज्ञता व्यक्त करा : आपले जीवन समृद्ध आणि चांगले आहे हे मान्य करण्यास आपण फार वेळ लावताे. समस्या आल्या, तरी त्यातून मार्ग काढण्यालाच जीवन म्हणतात हे आपण समजून घेतले पाहिजे. ‘इट टू बिट डिसिज’ या पुस्तकाचे लेखक डाॅ. विल्यम ली यांनी त्याचा उल्लेख केला आहे. प्रसिद्ध माॅडेल सिंडी क्राॅफर्डचा अनुभव त्यांनी दिला आहे. ही माॅडेल राेज जीवनातील अनेक चांगल्या घटनांबाबत कृतज्ञता व्यक्त करते. जीवनात सगळे वाईट कधी नसते. छाेट्या घटनासुद्धा आपल्याला आनंद देत असल्यामुळे जीवनाबाबत कृतज्ञ राहा आणि ती व्यक्त करण्यात कंजुषी करू नका, असे डाॅ. ली यांनी सांगितले आहे.