पुणे, 21 सप्टेंबर, (आज का आनंद न्यूज नेटवर्क)
लोहगाव विमानतळ आणि विमाननगरला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्याच्या कामाला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पर्यायी जोडरस्ता करण्यासाठी आवश्यक सुमारे अर्धा एकर जमीन ही संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची असल्याने त्यावर काम करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी आवश्यक होती, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली. खासदार बापट यांनी सांगितले की, पुणे विमानतळापासून विमाननगरला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यावर असलेली संरक्षण विभागाची केवळ 0.58 एकर (2350 चौ.मी.) जागेवर पुणे महापालिकेला काम करण्यास परवानगी मिळत नसल्याने सदरचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांना विमाननगरला व विमानतळाकडे जाण्यासाठी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत होता; तसेच या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. नवीन विस्तारित विमानतळासाठी देखील सदर रस्ता होणे गरजेचे होते. त्यामुळे सदरची जागा महापालिकेला नाममात्र दरात उपलब्ध करून काम तातडीने सुरू होण्यासाठी मी केंद्रीय संरक्षण मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होतो. त्याला याला यश आले असून, संरक्षण मंत्रालयाने विमानतळावरून 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी प्रस्तावित 20 मीटर रुंद असलेला रस्ता जोडणीसाठी पुणे महापालिकेला काम करण्याची परवानगी दिली.