झारखंडच्या हजारीबागमधील शाळेत माकड गिरवतेय शिक्षणाचे धडे

22 Sep 2022 14:21:23
 
 

Monkey 
 
मानवाचा पूर्वज असलेल्या माकडाने पाच दिवस वर्गात बाकावर बसून शिक्षणाचे धडे गिरवल्याचा प्रकार झारखंडमध्ये आढळून आला.झारखंडच्या हजारीबागमधील दानुआ गावातील एका सरकारी शाळेत पाच दिवसांपासून एक असामान्य पाहुणा येत आहे. माकडाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यात माकड समाेरच्या बाकावर बसून वर्गात उपस्थित असल्याचे दिसत आहे. याबाबत शाळेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गेल्या शनिवारी एक माकड शाळेच्या आवारात आले आणि इयत्ता सातवीमधील विद्यार्थ्यांच्या वर्गात बसले. विशेष म्हणजे पुढच्या रांगेत बसूते माकड शिक्षक सांगेल ते लक्षपूर्वक ऐकत हाेते. दरम्यान, या माकडाने मंगळवारी पुन्हा शाळेला भेट दिली आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसह धडे घेतले. गेल्या पाच दिवसांपासून हे माकड सकाळी येत हाेत तासभर वर्गात बसून ते जात हाेते.या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षक घाबरले आणि त्यांनी माकडाला हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते नित्यनेमाने वर्गात हजेरी लावत असे.
 
विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जाणीव ठेवून प्राचार्य रतनकुमार वर्मा यांनी माकडाला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. हजारीबागमधील वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आयुब अन्सारी म्हणाले, माहिती मिळाल्यावर, आमची टीम माकडाला पकडण्यासाठी शाळेत पाेहाेचली.आम्ही माकडाला जंगलाकडे नेण्यासाठी फळे आणि इतर खाण्यायाेग्य वस्तूंचा वापर केला. परंतु अधिकारी या माकडाला पकडण्यात अयशस्वी ठरले. मात्र, त्यांनी त्याला शाळेच्या आवारातून पळवून लावले. वनाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, तसेच शिक्षकांना सल्ला दिला की, शाळेच्या आत किंवा कॅम्पसच्या बाहेर काेणतेही खाण्याचे पदार्थ फेकू नका. खाद्यपदार्थ सहसा अशा प्राण्यांना आकर्षित करतात.अन्सारी म्हणाले की, जंगलाजवळील गावाच्या भागावर नियमितपणे लक्ष ठेवण्यासाठी रक्षक तैनात केले जातील.
आणीबाणीच्या परिस्थितीत ते शाळेत पिंजराही ठेवतील.
Powered By Sangraha 9.0