पिंपरी महापालिके समोर फेरीवाल्यांचे हल्लाबोल आंदोलन

    22-Sep-2022
Total Views |
  
HACKERS
 
पिंपरी, 21 सप्टेंबर (आ.प्र.)
 
हॉकर झोनमध्ये सोयीसुविधा द्याव्यात; तसेच महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईच्या एकतर्फी निर्णयाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. शहरातील दापोडी, निगडी, आकुर्डी, भोसरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, घरकुल, पिंपरी, सांगवी चौक आदी परिसरातील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते, माजी नगरसेवक मारुती भापकर, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, किरण साडेकर, रोहिदास शिवणेकर, अनिल मंदिलकर, सुखदेव कांबळे, तुकाराम माने, संभाजी वाघमारे, वहिदा शेख, माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, अरुणा सुतार, नंदा तेलगोटे, सरिता वाठोर, शारदा राक्षे, आशा बनसोडे, छाया देशमुख, मुमताज शेख, फरीद शेख, निरंजन लोखंडे, सुशेन खरात व पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. नखाते म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच फेरीवाल्यांना सामावून घेण्यासाठी व फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र, आयुक्तांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. महापालिकेकडून 2012/14 मध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या लोकांना जाणूनबुजून बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण केले जात नाही. सध्या सणांचे दिवस असल्यामुळे हातगाडी, स्टॉलधारकांवरील कारवाई थाबंवणे गरजेचे आहे.` मारुती भापकर म्हणाले, ‘हातगाडीवर व्यवसाय करून जगणाऱ्या लोकांकडे महापालिकेचे कायमच दुर्लक्ष झालेले आहे. महापालिकेचे अधिकारी एसीमध्ये बसून काम करतात. त्यांना या लोकांच्या भावना काय समजणार? अनेक वेळा शहरामध्ये आंदोलने होतात आणि ती मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, गोरगरिबांच्या या कायद्याकडे नेहमीच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यापुढेही अशीच परिस्थिती राहिली, तर फेरीवाल्यांना एकजुटीने काम करावे लागेल.`