मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही : मनाेरंजन क्षेत्रातील दिग्गजांशी मनमाेकळा संवाद आपली संस्कृती, कला जाेपासलीच पाहिजे.
ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी मला तुमचं ऐकायचंय...! आपण एकमेकांबद्दल बाेलत असताे. आता एकमेकांशी बाेलू या.., असं म्हणत एका विशेष भेटीत दिलखुलास संवाद साधला. या वेळी मराठी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
दादासाहेब फाळके चित्रनगरीत चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चित्रपटांना जीएसटीतून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन याेजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत, तसेच अनेक धाेरणात्मक बाबींविषयी मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयाने मार्ग काढला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अभिनेते व निर्माते प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते अशाेक सराफ, सचिन पिळगावकर, महेश काेठारे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, निर्माते विद्याधर पाठारे, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्राेत्री, जितेंद्र जाेशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्या-त्या क्षेत्रातील समस्या, मुद्द्यांची मांडणी केली. तसेच, याबाबी समजावून घेण्यासाठी आवर्जून आयाेजित केलेल्या या संवाद उपक्रमाचे स्वागतही केले.