इंडाेनेशियामध्ये ‘कुपी खाेप’ नावाची काॅफी मिळते. ही काॅफी ग्लासमध्ये भरून काचेच्या बशीत काॅफीने भरलेला ग्लास उलटा करून ग्राहकासमाेर टेबलावर आणून ठेवतात.अशीच पद्धत भारतातील दक्षिण भारतीय उडीपी रेस्टाॅरंटमध्ये आहे. फरक एवढाच की, भारतात स्टीलच्या फुलपात्रात चहा किंवा काॅफी भरून हे फुलपात्र स्टीलच्या वाटीत उलटे ठेवून ग्राहकाला देतात.इंडाेनेशियामध्ये काचेच्या बशीत झिरपलेली काॅफी स्ट्राॅद्वारे पितात, तर भारतात फुलपात्रातील काॅफी किंवा चहा वाटीत ओतून वाटीनेच पितात. यामुळे या प्रकारच्या काॅफीला ‘इंडाेनेशियन अपसाईड डाऊन काॅफी’ असेही म्हणतात. इंडाेनेशियामध्ये आचेह प्रांतात कुपी खाेप काॅफी मिळते. ही काॅफी राेबस्टा म्हणून ओळखली जाते. कुपी खाेप काॅफी इंडाेनेशियाची सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आली आहे. ज्यावेळी थर्मासचा शाेध लागला नव्हता त्यावेळी मासेमारी करणारे काेळी काॅफी थंड हाेऊ नये म्हणून मासे पकडता पकडता अशा प्रकारे काॅफी पीत असत. खाली बशी आणि त्यावर काॅफी भरलेला उलटा ग्लास, यामुळे काॅफी लवकर थंड हाेत नाही किंवा त्यात कचरा पडण्याची भीतीसुद्धा राहत नाही.