नागपूर विद्यापीठातील परीक्षांच्या तक्रारींची चाैकशी करणार

02 Sep 2022 13:35:34
 
 
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती : एमकेसीएलकडून काम काढून घेणार
 

Nagpur 
 
 
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षांच्या कामांचे कंत्राट एमकेसीएल कंपनीला देण्यासह परीक्षांच्या निकालाला झालेला विलंब आणि विद्यापीठाशी संबंधित इतर तक्रारींची सखाेल चाैकशी करण्यासाठी सचिवस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात येईल.एमकेसीएलला दिलेले काम तातडीने थांबवावे. तसेच, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सध्या परीक्षाविषयक कामकाज पाहणाऱ्या क्राेमार्क कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन तिच्यामार्फत आगामी परीक्षा घेण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या निकालाला झालेल्या दिरंगाईचा आढावा घेण्यासाठी पाटील यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात बैठक घेण्यात आली. आमदार नागाे गाणार, आमदार प्रवीण दटके, आमदार अ‍ॅड.अभिजित वंजारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्ताेगी, कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, प्र. कुलगुरू डाॅ. संजय दुधे, कुलसचिव डाॅ. राजू हिवसे, परीक्षा नियंत्रण बाेर्डाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे आदी या वेळी उपस्थित हाेते.
 
एमकेसीएलला चुकीच्या पद्धतीने परीक्षांविषयक कामांचे कंत्राट दिल्याचे, तसेच प्रथम वर्षाच्या निकालाला विलंब झाल्याचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित झाला हाेता.या कंपनीची निवड आणि तिच्या कामकाजाबद्दलच्या तक्रारींची सखाेल चाैकशी करण्यात येईल. विद्यापीठाने यापुढे परीक्षांविषयक कामकाजासाठी केंद्राने विकसित केलेल्या ‘समर्थ’ प्रणालीचा वापर करण्याला प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करावी, असे पाटील यांनी सांगितले.केंद्राने विकसित केलेल्या ‘समर्थ’ प्रणालीच्या वापरासाठी विद्यापीठाने पावले उचलली असून, त्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीत अपलाेड करण्याची कार्यवाही लवकरच हाती घेणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0