मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीस सर्वाेच्च प्राधान्य

19 Sep 2022 16:51:59
 
 
उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना साडेसातशे काेटींची मदत
 

CM 
 
मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहाेत. अजून खूप काम करावे लागेल. येथील सिंचनाचे प्रश्न ऐरणीवर आहेत.याचा सखाेल अभ्यास करून यावर काम करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम वाहिनी नद्यांतील मुबलक पाणी समुद्राला वाहून जाते. हे पाणी तुटीच्या गाेदावरी खाेऱ्यात वळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहाेत. मराठवाडा दुष्काळातून मुक्तीसाठी पुढे येण्याची गरज असून, येथील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजिण्यात आलेल्या मुख्य शासकीय समारंभात उपमुख्यमंत्री बाेलत हाेते. माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, महापाैर जयश्री पावडे, आमदार अमर राजुरकर, आमदार राम पाटील राताेळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डाॅ. तुषार राठाेड, स्वातंत्र्य सैनिक विष्णुपंत पुराणिक, वीरपत्नी गयाबाई करडिले, रुक्मिणीदेवी शर्मा, सूर्यकांताबाई गनमुखे, बालाजी जाेशी आदी उपस्थित हाेते. मराठवाडा ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर आपण काम केले.
 
यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंधारणाचे माेठे काम उभे राहिले. या कामाचा अधिक सकारात्मक परिणाम मराठवाड्यात झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सुमारे 750 काेटींचा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.मराठवाड्यातून नागपूर-मुंबई एक्स्प्रेसवे ला जाेडण्याच्या दृष्टीने नांदेड-जालना समृद्धी मार्गासाठी कटिबद्ध आहाेत. यासाठी जे भूसंपादन झाले आहे त्याचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. नांदेडचे भूमिपुत्र शहीद सहायक कमांडंट सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या वारसांना एक काेटींचा धनादेश उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. नांदेड जिल्हा परिषदेने तयार केलेल्या नांदेड जिल्हा पुस्तिकेचे आणि आराेग्य विभागाने तयार केलेल्या पाेषण मार्गदर्शिकेचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0