सरन्यायाधीश लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

13 Sep 2022 15:20:56
 
 

CM 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन : उच्च न्यायालयाच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेणार महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी याेग्य ताे मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यांमुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्क्यांपेक्षा थाेडी कमी तरतूद विधी व न्यायसाठी असून, ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
 
या कार्यक्रमास केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित हाेते. यावेळी न्या. गवई व न्या. अभय ओक यांच्या हस्ते न्या. लळीत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, संस्कृतमधील गाैरवपत्र देण्यात आले. झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.या सत्काराला उत्तर देताना न्या. लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. सर्वाेच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वाेच्च न्यायालयात काम केले, असे त्यांनी सांगितले.देशाच्या स्वातंत्र्याला 2047 मध्ये शंभर वर्षे पूर्ण हाेतील तेव्हा आपला देश पूर्णपणे विकसित असावा, अशी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची इच्छा असून, आपण सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन रिजिजू यांनी केले.न्या. गवई व न्या. ओक यांनीही मनाेगत व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0