निविदा न मागविता ओपन जिमच्यासाहित्याची खरेदी; 66 लाखांचा खर्च

07 Aug 2022 12:27:29
 
OPEN JIM
 
 
 
पिंपरी, 6 ऑगस्ट (आ.प्र.) 
 
पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील उद्याने, मैदान, पदपथ अशा 34 ठिकाणी ओपन जिम ही संकल्पना राबवली आहे. त्यापैकी आठ ठिकाणी निविदा प्रसिद्ध न करता जिमसाठी साहित्य बसवून देण्यात येणार आहे. त्यासाठी 66 लाख रूपये खर्च होणार आहे. महापालिकेच्या शहरात 86 व्यायामशाळा आहेत. अ, ब आणि क या वर्गानुसार व्यायामशाळांचे धोरण तयार करण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने, मैदान, पदपथ अशा ठिकाणीही ओपन जिम ही संकल्पना राबवली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या ओपन जिमचा लाभ घेतात.
महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आवश्‍यकतेनुसार विविध ओपन जिमसाठी साहित्य पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे. शहरात एकूण 34 ठिकाणी या ओपन जिम उभारण्यात आल्या आहेत. या जिमसाठी साहित्य आवश्‍यक आहे. क्रीडा विभागाच्या मागणीनुसार 70 लाख तरतुदीच्या मर्यादेत 13 प्रकारचे विविध ओपन जिम साहित्य प्रत्येकी 34 नग 34 ठिकाणी पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे.
सध्या आठ ठिकाणांसाठी या साहित्याचा पुरवठा करण्याकरिता चार पुरवठादारांनी लघुत्तम दर सादर केले. त्यामध्ये पुण्यातील एड्यनिडस यांनी तीन बाबींसाठी प्रतिनग एकूण 2 लाख 37 हजार रुपये दर सादर केला. ठाणे येथील बाबा प्ले वर्ल्ड यांनी तीन बाबींसाठी प्रतिनग 1 लाख 58 हजार रुपये दर सादर केला. ठाणे येथील हनी फन एन थ्रील कंपनीने तीन बाबींसाठी 1 लाख 76 हजार रुपये आणि पुण्यातील त्रिमूर्ती इंजिनीअरिंग यांनी चार बाबींसाठी प्रतिनग एकूण 2 लाख 55 हजार रुपये असा दर सादर केला. त्यानुसार, एका सेटसाठी 8 लाख 27 हजार रुपये खर्च होणार असून, आठ ठिकाणी हे ओपन जिम साहित्य बसविण्यासाठी एकूण 66 लाख 21 हजार रुपये खर्च होणार आहे.
Powered By Sangraha 9.0