दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या कीर्तन महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

07 Aug 2022 12:13:13
 
DAGDU
 
 
पुणे, 6 ऑगस्ट (आ.प्र.)
 
केवळ श्रावणातच नव्हे, तर सातत्याने धर्माभिमुख, समाजाभिमुख असलेली कार्ये उत्सवांतर्गत केली जातात. ऐक्याचा साधक, उत्साहाचा वर्धक, प्रेमाचा संवर्धक, धर्माचा रक्षक, भावनांचा संरक्षक असा उत्सव पाच तत्त्वांवर आधारलेला आहे. ज्या क्रियेने ईेशरीतत्त्व प्रकट होते, त्याला उत्सव म्हणतात, असे मत कीर्तनकेसरी हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संत सोपानदेव संस्थान सासवडचे प्रमुख वेिशस्त त्रिगुण महाराज गोसावी, शांताराम निम्हण, पांडुरंग दातार, दिनकर महाराज वांजळे, ट्रस्टचे माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. आपण असे काही बोलावे, ज्यातून विठ्ठल प्रकट होऊन डोलेल. शस्त्राचे घाव भरून निघतात. मात्र, शब्दाचे घाव कधीही भरून निघत नाहीत. भक्ती, ज्ञान, प्रेम, सत्य म्हणजे विठ्ठल आहे. आपण या सर्वांचे पालन करणे म्हणजे विठ्ठल आहे, असे वांजळे यांनी सांगितले. ट्रस्टच्या यू ट्यूब, फेसबुक पेजवरून घरबसल्या आणि प्रत्यक्षपणे पुणेकरांना कीर्तनांचा विनामूल्य आनंद घेता येणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0