महापालिकेत 25 वर्षांत लाचखोरीच्या 32 कारवाया

    07-Aug-2022
Total Views |
 
RISWAT
 
 
पिंपरी, 6 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सातत्याने लाचखोरीची घटना घडत आहेत. 1997 मध्ये चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथे सदनिकेची नोंदणी करण्यासाठी 300 रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकारापासून आजपर्यंत पालिकेतील लाचखोरी सुरूच आहे. 1997 पासून 2022 अशा 25 वर्षांत लाचखोरीच्या 32 कारवाया झाल्या आहेत. 32 अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. अगदी 100 रुपयांपासून ते 12 लाख रुपयांपर्यंतची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. यातील काहींना सेवेतून काढून टाकण्यात आले, काहींना न्यायालयाने निर्दोष ठरवल्याने त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहायकाचाही समावेश आहे.
 
महापालिका मुख्यालयातच लाच स्वीकाराताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पडकले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 17 फेब्रुवारी 1997 ते 19 मे 2022 या कालावधीत तब्बल 32 अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथक (एसीबी) ने रंगेहाथ पकडले आहे. यामधील काही अधिकारी, कर्मचारी निर्दोषमुक्त होऊन सेवेत रुजू झाले आहेत.
 
तर, एका अधिकाऱ्याला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. लाचखोरीच्या प्रकरणामुळे महापालिकेची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळली जात आहे. चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथे सदनिकेची नोंदणी करण्यासाठी 300 रुपयांची लाच उपलेखापालाने घेतली होती. या प्रकरणाने महापालिकेच्या लाचखोरी प्रकरणाने सुरुवात झाली. बोथरा यांना 17 फेब्रुवारी 1997 मध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यांना काही वर्षांनंतर पुन्हा महापालिका सेवेत घेण्यात आले. आतापर्यंत लाचखोरीच्या 31 घटना घटना घडल्या असून, 32 वी कारवाई नुकतीच करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेतील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या घटनांमुळे महापालिकेची प्रतिमा डागाळली आहे.