प्रत्येक नागरिकाने ‘घराेघरी तिरंगा’ अभियानात भाग घ्यावा

    06-Aug-2022
Total Views |

Tiranaga
मुख्य सचिवांचे आवाहन : प्रदर्शन व विक्री केंद्राचे मंत्रालयात उद्घाटन स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षात यंदा राज्यात घराेघरी तिरंगा अभियान राबवण्यात येत असून, या अभियानात राज्यातील सर्व नागरिकांनी हिरिरीने भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी केले. शासनाने यासाठी अतिशय सूक्ष्म नियाेजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियानामार्फत (उमेद) मंत्रालयात उभारण्यात आलेल्या प्रदर्शन व विक्री स्टाॅलचे मुख्य सचिवांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बाेलत हाेते. या वेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अपर मुख्य सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. हेमंत वसेकर, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत आदी उपस्थित हाेते.
 
राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील प्रभाग संघाच्या वतीने मंत्रालयात तीन दिवसांसाठी घराेघरी तिरंगा या अभियानांतर्गत प्रदर्शन व विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे मंत्रालयातील स्टाॅल महिला बचत गटातील आदिवासी महिलांचे आहेत. हे प्रदर्शन साेमवारी (8 ऑगस्ट) सायंकाळी 6 पर्यंत सुरू असणार आहे. या प्रदर्शनात तिरंगा ध्वजासह स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.घराेघरी तिरंगा अभियानात राज्यातील महिला बचत गटांच्या सर्व महिला सहभागी असून, या बचत गटातील महिला ध्वजाची निर्मिती आणि विक्रीही करत आहेत. शासनाने या संपूर्ण अभियानासाठी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांची नाेडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे.