गुन्हेगारांच्या बाेटांचे ठसे घेता येणार 50 रुपयांत

    06-Aug-2022
Total Views |
 
 

Fingre 
 
उसाच्या चाेयट्यापासून पावडर तयार करण्यात जयपूरमधील संशाेधकांना यश, खर्च 3 हजार 850 रुपय उसाच्या चाेयट्यापासून बाेटांचे ठसे घेण्याचे नवे तंत्र जयपूरमधील संशाेधकांनी विकसित केले आहे. या तंत्रामुळे ठसे घेण्यासाठी फक्त पन्नास रुपये खर्च येईल.काेणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी पाेलिसांना गुन्हेगारांच्या बाेटांच्या ठशांचा (फिंगर प्रिंट) उपयाेग हाेताे. त्यातून गुन्हेगारांना पकडता येते. पण ठसे घेण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या किटमधील दहा ग्रॅम पावडरसाठी 3 हजार850 रुपये खर्च येताे. मात्र, जयपूरच्या संशाेधकांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे केवळ पन्नास रुपयांत हे काम हाेईल. त्यासाठी ऊसाच्या चाेयट्याचा (बगॅस) वापर करण्यात आला आहे.
 
संशाेधकांच्या या पथकात चुरूतील वीस वर्षांच्या विनय आसेरी या तरुणाचाही समावेश असून, या पथकाने ‘शुगरकेन बगॅस नॅनाे बायाेचार फाॅर द डेव्हलपमेंट ऑफ लेंटेंट फिंगर प्रिंट’चे पेटंटही घेतले आहे. बाेटांचे ठसे शाेधण्यासाठीचे हे तंत्रज्ञान सर्वांत स्वस्त असल्याचे विनय आसेरी यांनी सांगितले. ही नवी पावडर सुरक्षित असून, तिचा फुप्फुसांच्या आराेग्यावर काेणताही दुष्परिणाम हाेत नसल्याचे विवेकानंद ग्लाेबल युनिव्हर्सिटीच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने (फाेरेन्सिक सायन्स) स्पष्ट केले आहे.शाईने घेतलेले ठसे कायमस्वरूपी नसतात गुन्हेगारांची चाैकशी करताना त्यांच्या बाेटांचे ठसे फिंगर प्रिंट शाईने घेतले जातात. पण, हे ठसे कायमस्वरूपी अथवा दीर्घकाळ टिकणारे नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 
पण पावडरीच्या साह्याने घेतलेले ठसे साठ वर्षे टिकू शकतात आणि स्पष्ट दिसतात. सध्या ब्लॅक चारकाेल पावडरचे किट वापरले जाते. ते महाग असून, त्यातील दहा ग्रॅम पावडरीतून पाच ते सात गुन्हेगारांच्या बाेटांचे ठसे घेता येतात.कचऱ्याच्या फेरवापराचा उद्देश ‘कचऱ्याचा फेरवापर करून त्याचे नॅनाे तंत्रज्ञानात रूपांतर करण्याचा आमच्या संशाेधनाचा उद्देश हाेता, अशी माहिती जयपूरमधील ‘मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टे्ननाॅलाॅजी’तील (एमएनआयटी) साॅफ्ट मटेरियल लॅबमधील सहायक प्राध्यापक डाॅ. कुमुदकांत अवस्थी यांनी दिली. ऊसाच्या चाेयट्यापासून तयार करण्यात आलेल्या पावडरीचे कण अत्यंत सूक्ष्म असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वापरले जाणारे किट परदेशांतून आयात करावे लागत असल्याने ते महाग असते. पण आम्ही ऊसाच्या चाेयट्यावर प्रयाेग करून ही पावडर तयार केली असून, तिला ‘नॅशनल क्राइम रेकाॅर्ड्स ब्युराे’ने (एनसीआरबी) मान्यता दिल्याचे ते म्हणाले.
 
विनय आसेरीचे वीस संशाेधन प्रबंध चुरूतील विकास आसेरी या व्यापाऱ्याचा मुलगा असलेला विनय सध्या जयपूरमधील विवेकांनद ग्लाेबल युनिव्हर्सिटीच्या फाेरेन्सिक सायन्स शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. अत्यंत बुद्धिमान असलेल्या विनयचे आतापर्यंत वीस संशाेधन प्रबंध आणि 23 बुक चॅप्टर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्याने दाेन पुस्तके लिहिली असून, दाेन संशाेधनांसाठी पेटंटचे अर्जही दाखल केले आहेत. फिंगर प्रिंटबाबतच्या संशाेधन पथकात विनयबराेबर अपूर्वा सिंह, डाॅ. गरिमा अवस्थी, महिपालसिंह सांखला, डाॅ. कुमुदकांत अवस्थी आणि प्रा.
एस. एस. डागा यांचा समावेश हाेता.