गर्दीने भरलेल्या शहरांमध्ये माणसे मात्र एकाकी

    06-Aug-2022
Total Views |
सततच्या एकाकीपणामुळे शारीरिक आराेग्याबराेबरच मानसिक समस्याही निर्माण हाेतात

Alone
संध्यानंद.काॅम
बदलत्या काळात शहरीकरण वाढत चालले आहे. राेजगाराच्या संधी असल्यामुळे लहान शहरे आणि गावांतून माेठ्या शहरांत येणाऱ्यांचा ओघ वाढताे आहे. पण गर्दीने भरलेल्या शहरांतही एकटे असल्यासारखे वाटणे हे बहुदा शहरी हवेचे वैशिष्ट्य असावे.
बहुसंख्य लाेकांना तसेच वाटते. उत्तुंग इमारती आहेत, उद्याने आहेत, करमणुकीची, खाण्या-पिण्याची साेय आहे, सगळे काही आहे; पण एकाकीपणा पाठ साेडत नसल्याची वस्तुस्थितीसुद्धा आहे. उंच, सुंदर इमारतींमध्ये राहण्याची चांगली साेय असली, तरी तेथे जणू कप्पे आहेत. तेथे राहणाऱ्यांचा आपसांत क्वचित संवाद असताे. महामारी सुरू हाेण्यापूर्वी लाेक रात्री उशिरापर्यंत कामावर असत. पण महामारी सुरू झाल्यावर घरी बसावे लागले आणि त्यातून एकाकीपणा आणखी वाढला. महामारी नसताना एकाकीपणा टाळण्यासाठी अनेक जण ऑफिसात उशिरापर्यंत काम करत बसावयाचे.
 
पण महामारीच्या काळात घरूनच कामाची सक्ती झाल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. त्यातून मानसिक तणाव वाढले. शहरी भागांत राहताना हा एकाकीपणा अटळ ठरताे आणि मिलेनियल्स पिढीला त्याचा त्रास जास्त जाणवत असल्याचे दिसले आहे.हा एकाकीपणा खरा आहे का? शहरी भागांत राहण्यामुळे येणाऱ्या एकाकीपणाला ‘अर्बन लाेनलीनेस’ म्हणतात. हे काय आहे, याची माहिती देताना फाेर्टिस हेल्थकेअरमधील मानसिक आराेग्य विभागाच्या प्रमुख कामना छिब्बर म्हणतात, ‘शहरी भागांत राहण्यामुळे येणारा एकाकीपणा वाढत चालला आहे. स्वत:पासून आणि इतरांपासून आपण तुटत चालल्याची भावना यात निर्माण हाेते. कठीण काळात आपल्याला काेणाचा पाठिंबा नसल्याची जाणीव हाेते. सभाेवताली खूप लाेक असूनसुद्धा आपण माेकळेपणाने आपल्या खऱ्या भावना व्यक्त करू शकत नसल्याचे यात जाणवायला लागते. त्यातून ताण वाढताे.’ फाेर्टिस नॅशनल मेंटल प्राेग्रामचे प्रमुख डाॅ. समीर परिख यांच्या मते, मनातील ही अस्वस्थता आणि एकाकीपणाचा परिणाम दैनंदिन आयुष्यावर हाेऊ लागताे, प्रत्येक गाेष्टीबाबत शंका निर्माण व्हायला लागतात.
 
लाेक काय करत आहेत, का करत आहेत, त्यांना कुटुंब आहे की नाही, असे प्रश्न पडायला लागतात. मग त्यातून एकाकीपणा टाळण्यासाठी लाेक कामात जास्त गुंतायला लागतात. वाढती स्पर्धा हेसुद्धा एकाकीपणाचे एक कारण असते. स्वत:ला सिद्ध करून वरच्या पदावर पाेहाेचण्याची प्रत्येकाची इच्छा असल्याने या धावपळीत आपल्याला काय हवे आहे आणि आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे याचा विचार करण्यासाठी काेणी थांबत नाहीत.त्याच वेळी कामाचा वाढता बाेजा आणि संकुचित हाेत चाललेले नातेसंबंध हा घटकही महत्त्वाचा ठरताे. गॅजेट्सचा वाढता वापर आणि बदललेली जीवनशैली हे घटकसुद्धा त्यामागे असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. सतत काही तरी नवीन हवे असण्याची इच्छा हाेण्यामुळेही एकाकीपण वाढत असल्याचे डाॅ. परिख नमूद करतात. जागरूक राहण्याची गरज एकाकीपणा म्हणजे केवळ मानसिक स्थिती नसून, त्यावर इलाज करण्याची गरज असल्याची जाणीव आता हाेऊ लागली आहे.
 
तसे पाहिले, तर एकाकीपण हा मानसिक विकार नाही आणि ‘अँ्नझाइटी डिसऑर्डर’ अथवा नैराश्याची लक्षणे दिसेपर्यंत मानसाेपचार तज्ज्ञांच्या सल्ला घेण्याची सहसा गरज नसते. पण आपले मानसिक आराेग्य चांगले ठेवण्यासाठी तसा सल्ला घेणे याेग्य ठरते. त्यासाठी पहिली पायरी म्हणजे, आपल्यात एकाकीपणा वाढत असल्याचे मान्य करणे. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काेणाचा तरी सल्ला अथवा मदत घेतली पाहिजे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी.‘तुम्हाला एकाकीपणाची जाणीव हाेत असेल, सामाजिक पाठिंबा नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले,’ असे कामना छिब्बर या सांगतात. वेळेवर मदत न घेतल्यास, जेवण आणि झाेपेच्या वेळा विस्कळीत हाेतात आणि त्यातून चिंता वाढत जात असल्याचे त्या स्पष्ट करतात.