गणेशाेत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा पर्याय सुचविण्यासाठी राज्य सरकारने सहा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशाेत्सव साजरा झाल्यानंतरच हा अहवाल येणार आहे.सर्वाेच्य न्यायालय व हरित लवादाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशमूर्तींचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर नैसर्गिक जलस्राेत प्रदूषित हाेणार नाहीत, यावर ही समिती भर देणार आहे. प्लॅस्टर आँफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करताना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची शक्यता पडताळून पाहणे, गणेशमूर्तींसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक पर्याय सुचविणे आणि गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर नैसर्गिक जलस्राेत प्रदूषित हाेणार नाहीत, यासाठी सूचना करण्याची जबाबदारी या समितीवर साेपवण्यात आली आहे. या समितीवर हाेणारा खर्च महाराष्ट्र प्रदूषण मंडळावर साेपवण्यात आला आहे.