लहान मुलांच्या प्रश्नांना वेळीच याेग्य उत्तरे द्या

    05-Aug-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

Childrens 
 
सजीवसृष्टीच्या आरंभापासून जग बदलते आहे. किंबहुना, सतत बदलते त्यालाच जग म्हणावे लागेल. आपल्या विद्यमान जगात अजून खूप अंधार असून, मुलांच्या मनात त्याबाबत अनेक प्रश्न आहेत. सन 2020मध्ये अमेरिकेतील पाेलिसांच्या हिंसाचारावरून माझा छाेटा मुलगा हँक यालाही एक प्रश्न पडला हाेता.‘चांगली माणसे’ कधी कधी वाईट काम का करतात, असा त्याचा सवाल हाेता. गेले काही दिवस ताे आमच्याबराेबर युद्धासंदर्भात बाेलताे आहे. मी स्वत: तत्त्वज्ञानी असून, माझी मुले अजून प्राथमिक शाळेत असली, तरी रात्रीच्या जेवणाच्या वेळी हाेणारी आमची चर्चा माझ्या काॅलेजातील विद्यार्थ्यांबराेबरच्या चर्चेपेक्षा जास्त चांगली असते. एका रात्री हँक आणि त्याचा माेठा भाऊ रे्नस यांच्यात सत्याच्या स्वभावावरून वाद झाला. ‘डाेनाल्ड ट्रम्प हे एक वाईट अध्यक्ष आहेत,’ असे रे्नस म्हणाला. त्यावर ‘ते आपल्यासाठी वाईट अध्यक्ष असले, तरी जे लाेक त्यांना पसंत करतात त्यांच्यासाठी ते चांगले अध्यक्ष आहेत,’ असे उत्तर हँकने दिले.
 
दाेघेही आपल्या म्हणण्यावर ठाम हाेते. मी म्हणालाे, ‘हँक, जे लाेक ट्रम्प यांना पसंत करतात, ते त्यांना चांगले मानतात ते चूक आहेत का?’ त्यावर हँक म्हणाला, ‘नाही. ते लाेक त्यांना चांगले मानतात आणि आपण वाईट. पण काेण बराेबर याचा निर्णय काेणीच करू शकत नाही.’ प्रत्येकाचे विचार वेगळे आणि ते त्याच्या दृष्टीने बराेबर असल्याचे यातून जाणवते. प्रत्येकाचे सत्य वेगळे असू शकते.माझी मुले अशा चर्चा यापुढेही चालू ठेवतील अशी मला आशा आहे. त्यांनी जगाबाबत, सत्य आणि न्यायाबाबत खाेलवर विचार करावा अशी माझी इच्छा असली, तरी मुले माेठी हाेत जातात तशा अशा चर्चा बंद हाेत असल्याचे संशाेधक सांगतात. 3-8 वर्षे वयाेगटांतील मुले बहुदा असे तात्त्विक प्रश्न करतात. त्यात ‘जगाचे अस्तित्व कशासाठी आहे?’, ‘मृत्यूनंतर काय हाेते?’, ‘माझे आयुष्य मी पाहिलेल्या स्वप्नांसारखे असेल का?’
 
यासारख्या प्रश्नांचा समावेश असताे. मुलांसाठी जग म्हणजे एक काेडे असते आणि ते साेडविण्याचा त्यांचा प्रयत्न असताे. पण वय वाढत गेल्यावर लाेक आपल्याला काय म्हणतील याचा विचार ती करायला लागतात. आपण मूर्ख-बावळट नसल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू हाेताे. जगाचे अस्तित्व कशासाठी, असा प्रश्न काेणाला पडत नसल्याचे त्यांना उमगते.पण, याचा ताेटा म्हणजे, बदलत्या काळात ही मुले कुतूहल गमावितात आणि प्रश्नांची उत्तरे शाेधण्याचे धाडस त्यांच्यात उरत नाही. जगाचा गांभीर्याने आणि खाेलवर विचार करणाऱ्यांची आज गरज आहे. तसे विचार करण्यापेक्षा आपण एका भ्रामक जगात वावरताे आणि ट्विटरवरील चर्चेला जास्त महत्त्व देताे. पण आपण आपल्या मुलांना तत्त्वज्ञानिषयक विचारांची ओळख करून दिली तर ती पुढे प्रश्नांची उत्तरे शाेधण्याचा प्रयत्न नक्की करतील. म्हणजे, नव्या पिढीतून तत्त्वज्ञ तयार हाेतील. हे करणे फार कठीण नाही. मुलांबराेबर बाेला आणि खाेलवर विचार करण्यास त्यांना प्राेत्साहन द्या.
 
त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही विचारत असलेले प्रश्न फार कठीण असण्याची आणि ते तत्त्वज्ञानातीलच असण्याची गरज नाही.‘तू काय विचार करताे आहेस?’ ‘तू असा विचार का करताेस?’ ‘तुझ्या या बाेलण्याचा अर्थ काय?’ ‘तू चुकताे आहेस याची जाणीव आहे का?’ असे अगदी साधे प्रश्न विचारता येतील. प्रश्न विचारण्याचा उद्देश मुलांनी तर्क करावा आणि त्याची दुसरी बाजू त्यांना समजावी एवढाच असावा. मुलांना जास्त बाेलू द्या आणि ती अडतील तेथे मदत करा. मूल काय सांगते आहे ते गांभीर्याने घ्या. ते चुकीचे बाेलत असले, तरी राेखू नका. त्याने काय विचार करावा हे त्याला सांगू नका. पण मुलांबराेबर चर्चा करण्यासाठी पुस्तकांची गरज नाही.
 
फक्त मुलांचे बाेलणे नीट ऐका आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन शंकासमाधान करा.मूल एखाद्या घटनेला चूक म्हणत असेल, तर ती चूक काय हा प्रश्न त्याला करायला हवा. मी लहान असताना मलाही कुतूहल हाेते आणि मी माझ्या वडिलांना अनेक प्रश्न विचारायचाे आणि ते उत्तर देत असत. पण यात माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत असली, तरी स्वत: उत्तरे शाेधण्याची संधी जाणे हा ताेटा हाेता. पण आज माझी मुले मला प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना त्यांची उत्तरे शाेधण्यास सांगताे.काेणत्याही विषयावर चर्चा करता येते. त्या विषयाचे ज्ञान असणे गरजेचे नाही. मुले काहीही विचारत असली, तरी त्यांच्याबराेबर संवाद ठेवणे महत्त्वाचे.