मुंबईत महिनाभरात 670 किलाे प्लॅस्टिक जप्त

    04-Aug-2022
Total Views |
 
 
 

Plastics 
गेल्या दाेन वर्षांपासून थंडावलेली प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई महापालिकेने यंदा 1 जुलैपासून पुन्हा धडाक्यात सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात पालिकेच्या पथकांनी मुंबईत 18 हजारांपेक्षा अधिक ठिकाणी भेटी देऊन तपासणी केली. या कारवाईत 670 किलाेहून अधिक प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, 177 जणांकडून 8 लाख 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
काेराेनामुळे दाेन वर्षे प्लॅस्टिकविराेधातील कारवाई थांबली हाेती. माॅल, बाजारपेठा, दुकाने, फेरीवाले अशा गर्दीच्या ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. 50 मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत 26 जुलै 2005 राेजी आलेल्या महापुराला पिशव्या कारणीभूत ठरल्या हाेत्या.
 
तसेच, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्यास विविध बाबींसह प्लॅस्टिकही कारण ठरत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर कडक निर्बंध घातले असून, पालिकेला कारवाई वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. पन्नास मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे.कारवाईसाठी प्रशासनाने विशेष पथक नेमले असून, परिमंडळनिहाय कारवाई केली जाते आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर पर्यावरणास हानिकारक असल्याने पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त संजाेग कबरे यांनी सांगितले.