राज्यातील जनहिताची कामे थांबणार नाहीत

    04-Aug-2022
Total Views |
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही : पुणे विभागातील कामांचा घेतला आढावा
 

CM 
 
पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी काेणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.नागरिकांच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावीत. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वताेपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयाेजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री बाेलत हाेते. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त साैरभ राव, विविध विभागांचे राज्य आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित हाेते.
 
या बैठकीत विभागातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. पुणे रिंगराेडसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला गती द्यावी. भूसंपादनातील वादाचे मुद्दे लाेकअदालतीच्या माध्यमातून सामाेपचाराने साेडवावेत. वाहतुकीचे नियाेजन करताना रिंग राेडला जाेडणाऱ्या मिसिंग लिंकचा समावेश करावा. पुणे शहरातील वाहतूककाेंडी साेडवण्यासाठी आवश्यक नियाेजन करावे.रस्त्यावरील खड्डे भरताना तात्पुरते काम न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील एकात्मिक वाहतूक आराखड्याबाबत एकत्रित बैठक मुंबईत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटन विकास, मेढा-केळघर येथील पुलाचे काम, प्रतापगड परिसर विकास, शिखर शिंगणापूर विकास आदींबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. गणेशाेत्सव उत्साहाने साजरा हाेईल, यादृष्टीने प्रशासनाने मंडळांशी समन्वयाने नियाेजन करावे.सण-उत्सवांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि शांततेत सर्व उत्सव पार पडतील, या विषयी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.विभागीय आयुक्तांनी पुणे विभागातील विविध विषयांबाबत सादरीकरण केले.
प्रारंभी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. पुणे जिल्हा परिषदेंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा याेजनेच्या वतीने अंगणवाडी केंद्रातून पाेषक तत्त्वयुक्त आहार अंतर्गत हाॅर्लिक्स वाटपाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.