संध्यानंद.काॅम
विद्यां ददाति विनयं, विनयाद् याति पात्रताम। म्हणजे, विद्या विनय देते आणि विनयातून पात्रता येते.संस्कृतमधील हे वचन खरेतर आजच्या तरुण पिढीला जास्त याेग्य ठरायला हवे. कारण, आज प्रत्येक मूल शिकत असल्यामुळे त्याच्यात नम्रता, म्हणजे विनय असायला हवा. पण वास्तावातील चित्र विरुद्ध दिसते. ही मुले एवढी आक्रमक का आहेत? त्यांच्या वागणुकीचे गंभीर परिणाम का हाेत आहेत? उत्तर प्रदेशाच्या बुलंदशहरात गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेली घटना पाहा.टीव्हीवरील एका शाेमधून ‘प्रेरणा’ मिळालेल्या पाच किशाेरवयीन मुलांनी सात वर्षांच्या एका मुलाचे अपहरण करून त्याला मारून टाकले. अपहरण करणारी मुले म्हणजे विद्यार्थी असून, त्यातील एकाने आर्थिक व्यवहारात 40 हजार रुपये गमाविल्यामुळे ताे चिंतेत हाेता. अशाच प्रकारची; पण थाेडी वेगळी घटना लखनाैमध्ये घडली. आई आपल्याला माेबाइल गेम खेळू देत नसल्याच्या रागातू 16 वर्षांच्या तिच्या मुलाने गाेळी घालून आईची हत्या केली आणि तिचा मृतदेह तीन दिवस घरात दडवून ठेवला.
या काळात त्याने मित्रांना घरीसुद्धा बाेलावले हाेते. या मुलाने त्याच्या दहा वर्षांच्या बहिणीला धमकावून एका खाेलीत डांबून ठेवले हाेते.पाेलिसांनी त्याला अटक केल्यावरसुद्धा या मुलाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना नव्हती.एका अभ्यासातील माहितीनुसार, विविध बालगुन्हेगारी घटनांत पकडलेल्या मुलांमध्ये 99 टक्के किशाेरवयीन मुले आहेत. यातील 85 टक्के मुले आई-वडिलांसाेबत राहत हाेती. मग मुलांच्या या गुन्ह्यांबद्दल आई-वडिलांना दाेषी मानावे का? या मागची कारणे जाणून घ्या : मुलांमधील या रागामागे मानसिक तणाव आहेत, साेशल मीडियाचा प्रभाव आहे, की घरातील नकारात्मक वातावरण? किशाेरवयातील गुन्ह्यांमध्ये सर्वसाधरणपणे वाईट संगत, तारुण्यात येताना बदलणारी मानसिक स्थिती, वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक संघर्ष किंवा अतिप्रमाणात सामाजिक दबाव ही कारणे असतात.आता तर इंटरनेट सगळ्यांच्या आवा्नयात आल्यामुळे मुले त्यावर काहीही पाहू शकतात, शिकू शकतात. याशिवाय काही वेळा पालकांचा मुलांवर असलेला जास्त दबाव कारणीभूत ठरताे. त्यात आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात चमकावे ही इच्छा येते आणि त्यातून मुलांवर ताण येताे.
आर्थिक परिस्थिती : आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या घरांतील आई-वडील पैशांची तरतूद करण्याच्या प्रयत्नांत मुलांकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. पण चांगली आर्थिक स्थिती असतानाही करिअरमध्ये व्यग्र असलेल्या पालकांचे मुलांच्या भावनात्मक विकासाकडे दुर्लक्ष हाेते. दुर्बल आर्थिक स्थिती असलेल्या घरांतील अनेक पालक स्वत:च गुन्हेगारीत गुंतलेले असल्याने मुलेही तेच शिकतात. पण सगळी संपन्नता असूनही मुलांना वेळ दिला जात नसल्यामुळे अशा घरांतील मुले वाईट मार्गाला लागतात.
कुटुंबही असते जबाबदार : मुलांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी वृत्तीला काैटुंबिक कारणेही काही प्रमाणात जबाबदार आहेत. मुले लहान असताना त्यांच्या जडणघडणीत कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते. या काळात मुलांना सामाजिक नियम, प्रेम आणि सहकार्याची भावना जाणून घेतात.उपजीविकेसाठीचे शिक्षण घेत असताना जीवनमूल्येही कशी जपावीत याची माहिती त्यांना मिळते. पण कुटुंबातील वातावरण वाईट असेल, तर मुलांकडून अशी अपेक्षा कशी करणार? घरातील नकारात्मक वातावरणामुळे मुलांमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि हिंसेसारखी वृत्ती वाढते. मुलांना याेग्य मार्गावर ठेवण्यासाठी केवळ पालन-पाेषण पुरेसे नसते, तर आधारही महत्त्वाचा असताे. चांगले-वाईट यांतील फरक पालकांनीच मुलांना समजावून सांगायला हवा.
ऑनलाइन हालचालींवर ठेवा नजर : काेणतीही व्यक्ती गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसली, तरी आसपासच्या वातावरणामुळे अशी प्रवृत्ती वाढते. किशाेरवयीन मुलांमध्ये अशी प्रवृत्ती निर्माण हाेऊ नये म्हणून त्यांना चांगले, सकारात्मक वातावरण मिळायला हवे. सध्याच्या काळात मुलांमधील ऑनलाइन गेमिंगचे प्रमाण वाढत असताना मुलांना केवळ गरजेपुरताच माेबाइल देणे आणि त्यांना गेमिंगचे व्यसन लागणार नाही याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे अनेक मुलांनी गुन्हे केल्याचे सिद्ध झाले आहे.पबजी’ गेम खेळू न दिल्याबद्दलसुद्धा हिंसक घटना घडल्या आहेत, तर काेठे ऑनलाइन गेमिंगमध्ये मागणी केलेल्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी अपहरणासारखे प्रकार घडले आहेत.
या स्थितीत मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांनी काेणते गेम किती वेळ खेळावेत याची स्पष्ट जाणीव त्यांना गॅजेट त्यांच्या हाती देण्यापूर्वीच द्या. शिक्षकांकडूनही मुलांच्या प्रगतीबाबत माहिती घेत राहा.मानसिक आराेग्याकडे दुर्लक्ष नकाे : मानसिक अनाराेग्य हे किशाेरवयीन गुन्ह्यांचे एक कारण असल्याचे समाेर आले आहे. आपल्या मुलांच्या मानसिक आराेग्याबाबत पालकांनी जागरूक राहायला हवे. अनेकदा मुलांच्या वागण्याकडे पालकांचे दुर्लक्ष हाेते, ते टाळा. मुलांना त्यांच्या चुका वेळेवर दाखवा आणि त्या सुधारण्यास सांगा. तुम्ही दुर्लक्ष केलेत, तर मुले पुढे गुन्हेगारीकडे वळतील. मूल एकदम गप्प बसायला लागले, फार चिडायला लागले किंवा एकटे राहायला लागले, तर वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.