थकवा, ताण असताना ड्रायव्हिंग टाळा, गाडी चालवताना फाेन वापरू नका
संध्यानंद.काॅम
समाजात वागण्याबाबत काही नियम असतात आणि त्यांचे पालन केले जाते. तेच तत्त्व वाहन चालवण्यालाही लागू पडते. आपले वाहन असणे ही अभिमानाची आणि साेईची बाब असली, तरी त्या साेबत जबाबदारीही येत असल्याचा अनेकांना विसर पडताे. वेगाने, बेदरकारपणाने वाहन चालवण्यामुळे चालकाबराेबरच इतरांचे आयुष्यही धाे्नयात येते याची जाणीव ठेवायला हवी. पण, भारतातील चित्र निराशाजनक आहे. राष्ट्रीय गुन्हे नाेंदणी संस्थेने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या 2020च्या ‘क्राइम इंडिया’ या अहवालातील माहितीनुसार, बेपर्वाईमुळे झालेल्या रस्ते दुर्घटनांत तीन वर्षांत 3.92 लाख लाेक मरण पावले. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, भारतात दर वर्षी साडेचार लाख रस्ते दुर्घटना हाेतात आणि त्यात दीड लाख लाेकांचा मृत्यू हाेताे. भारतात जगाच्या फक्त एक टक्का वाहने असताना जगभरात हाेणाऱ्या मृत्यूंमध्ये भारतातील प्रमाण 11 टक्के आहे. देशात दर तासाला 53 रस्ते अपघात हाेत असून, दर चार मिनिटांना एक मृत्यू हाेताे. रस्त्यांवरून वाहन चालवताना हाेणाऱ्या छाेट्या चुकांमुळे अपघात घडतात, पण आपण ते राेखू शकताे. कसे, ते पाहा.
अनफिट गाडी चालविणे : रस्त्यांवर बेपर्वाईने गाडी चालवण्याबराेबरच आपल्या वाहनाच्या देखभालीबाबतही लाेक बेफिकीर असल्याचे आढळले आहे. तुमच्या गाडीची स्थिती चांगली नसेल; म्हणजे तिचा फिटनेस याेग्य नसेल, तर ती रस्त्यात कधीही धाेका देऊ शकते. हे टाळावयाचे असेल, तर वाहन कायम उत्तम स्थितीत ठेवायला हवे. लांबच्या प्रवासाला जाणार असाल, तर गाडीचे बाॅनेट उघडून फ्ल्युइड लेव्हल तपासा. गाडीचे सर्व दिवे, वायपर्स व्यवस्थित काम करत आहेत ना, हे पाहा आणि टायरही तपासा.
गाडीचे ्नलच आणि ब्रेक याेग्य प्रकारे काम करत असल्याचे पाहण्यासही विसरू नका.
वेगाने गाडी चालविणे : समाेरच्या गाडीच्या पुढे जाण्याच्या नादात अनेक जण चुकीच्या बाजूने तिला ओव्हरटेक करतात. पण आपण काेणाला हरवण्यासाठी, मागे टाकण्यासाठी रस्त्यावर उतरलाे नसल्याचे लक्षात ठेवा. तुम्हाला जसे काेठे तरी जावयाचे असते तसे इतरांनाही. अतिवेगाने गाडी चालवण्याच्या नादात निष्पाप लाेकांवर रुग्णालयात दाखल हाेण्याची दुर्दैवी वेळ येते. हे टाळण्यासाठी वेगमर्यादेचे पालन कसाेशीने करण्याची सवय अंगी बाणवून घ्यावयास हवी. शहरांत ताशी 40 किलाेमीटर पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवू नका, रुग्णालये आणि शाळांजवळून जाताना वेग आणखी कमी करा आणि स्पिडब्रेकरवरून गाडी सावकाश न्या.
सलग ड्रायव्हिंग करणे : वाहन चालवणे हे एक अत्यंत जबाबदारीचे काम आहे आणि आपण संपूर्ण सजग असतानाच ते व्यवस्थित हाेऊ शकते. वाहन चालवताना मेंदू पूर्ण जागरूक असणे आवश्यक ठरते. पण अनेक जण लाेक थकव्याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत असतात आणि त्याचा परिणाम अपघातात हाेताे. गाडी चालवताना तुमची मानसिक स्थिती चांगली असायला हवी.
त्यामुळे थकवा, ताण अथवा रागात असाल, तर गाडी चालवणे टाळा.याचा फायदा तुम्हालाच नव्हे, रस्त्यांवरील इतरांनाही हाेईल.
गाडी चालवताना फाेनवर बाेलणे : माेबाइलवर बाेलत गाडी चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण. तुम्ही वाहन चालवत असताना तुमचे सगळे लक्ष रस्त्यावरच हवे. सभाेवतालची वाहतूक कशी चालू आहे यावर तुमचे लक्ष असायला पाहिजे. पण माेबाइलवर बाेलत असताना लक्ष विचलित हाेते. फाेनवर बाेलत असताना किंवा मेसेज पाठवत असताना अपघात हाेण्याच्या बातम्या नवीन राहिल्या नाहीत. ही वाईट सवय साेडायला हवी. अगदीच आवश्यक असेल, तर ‘हँड्स फ्री’ डिव्हाइसचा वापर करा. गाडी चालवताना संगीत ऐकत असाल, तर त्याचा आवाज कर्कश न ठेवता मंद ठेवा.थाेड्या सावधगिरीने अपघात हाेतील कमी वाहन चालवताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवा.त्यामुळे दुसरे वाहन तुमच्या उजव्या बाजूने पुढे जाईल. एखादे वाहन तुम्हाला ओव्हरटेक करत असताना तुमच्या गाडीचा वेग वाढवू नका.
इंडिकेटर्सचा वापर करण्यात आळस करू नका.तुम्हाला काेणत्या दिशेला वळायचे आहे याची माहिती मागील वाहनचालकाला त्यामुळे मिळते.गाडीचे इंडिकेटर्स खराब झाले असतील, तर हात दाखवून इशारा करा.रुग्णवाहिका आणि अग्निशामकदलासारख्या आपत्कालीन सेवेतील वाहनांना आधी रस्ता देणे ही कुशल वाहनचालकाची जबाबदारी असते.
वाहतूक नियंत्रण दिवे, सिग्नल्सकडे दुर्लक्ष करू नका.सिग्नल ताेडून जाण्यात काही शाैर्य नाही. गाडी कायम ‘स्टाॅप लाइन’च्या अलीकडे थांबवा.तुमच्या पुढे असलेल्या वाहनापासून आपल्या गाडीचे अंतर याेग्य ठेवा. समाेरच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला, तर तुम्हाला थांबायला त्यामुळे जागा आणि वेळ मिळताे.
सिग्नल लागल्यावर सर्वांत पुढे थांबण्याची कसरत करू नका. तुमच्या घाईमुळे वाहतुकीची काेंडी हाेऊ शकते. रांगेतच उभे राहा.
चार चाकी वाहन चालवत असाल, तर न विसरता सीटबेल्ट लावा. दुचाकी वापरत असाल, तर हेल्मेट अवश्य वापरा. मागे बसलेल्या व्यक्तीनेही ते वापरायला हवे. हेल्मेट चांगल्या गुणवत्तेचे घ्या.केवळ पाेलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हेल्मेटच्या दर्जात तडजाेड करू नका.पुढे जाण्यासाठी हाॅर्नचा वापर टाळा. तुमच्या सततच्या हाॅर्न वाजवण्यामुळे पुढील वाहनचालक गडबडून अपघात हाेऊ शकताे.कारच्या विंडशिल्डवर काेणतीही स्टिकर लावू नका.मागील दृश्य पाहण्यात त्यामुळे अडथळा येताे.