आळंदी, 11 ऑगस्ट (आ.प्र)
रक्षाबंधनानिमित्त मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील मुक्ताबाई संस्थानकडून आणलेली ‘मुक्ताई राखी` मुक्ताई मंदिराचे विश्वस्त संदीप रवींद्र पाटील आणि त्यांच्या पत्नी अंकिता पाटील यांच्या हस्ते राखीचे विधिपूर्वक पूजन करून ज्ञानेश्वरांच्या समाधीला बांधण्यात आली. याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर, सासवड आणि आपेगाव येथील तीन भावांच्या समाधीवरही मुक्ताबाईंची राखी बांधण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेतील संत मुक्ताबाई त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ, सोपानकाका आणि ज्ञानेश्वरांना राखी बांधण्याची परंपरा जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाईंचे समाधिस्थळ असलेल्या संत मुक्ताबाई संस्थानने आजही जपली आहे. या प्रसंगी आळंदी येथील देवस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सागर लाहुडकर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती संत मुक्ताबाई संस्थान आळंदी शाखेचे व्यवस्थापक ह.भ.प. गजानन महाराज लाहुडकर यांनी दिली.