नवी मुंबईतील शाळांमध्ये लसीकरणास सुरुवात

    08-Jul-2022
Total Views |

Vaccine
महिनाभरात 225 शाळांमध्ये उपलब्ध करून देणार सुविधा नवी मुंबईत चाैथ्या लाटेतही काेराेना स्थिती नियंत्रणात ठेवण्यात महापालिकेला यश आले असताना दुसरीकडे उर्वरित मुलांचे व नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मुलांच्या शंभर टक्के लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाचे नियाेजन करण्यात आले असून, याची सुरुवातही करण्यात आली आहे. महिनाभरात 225 शाळांत लसीकरणाची सुविधा करून देण्यात येणार आहे.लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर पालिकेने याेग्य नियाेजन करत लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. 18 वर्षांवरील नागरिकांना दाेन्ही लसमात्रा देण्यात आल्या आहेत. आता मुले व उर्वरित लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.वद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या 100 टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी पालिकेने 30 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण माेहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
 
पालिका क्षेत्रातील 225 शाळांत लसीकरणासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.या महिनाभरात 29646 मुलांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सेक्टर 19 मधील न्यू हाेरायझन पब्लिक स्कूल या शाळेपासून या विशेष लसीकरण माेहिमेला सुरुवात करण्यात आली.12 ते 14 वयाेगटातील मुलांना काेर्बिव्हॅक्स लशीचा पहिला व दुसरा डाेस देण्यात येणार असून, 15 ते 18 वयाेगटातील मुलांनाही पहिला व दुसरा डाेस देण्यात येणार आहे.नवी मुंबईत पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच नियाेजनबद्धरीत्या लसीकरणाचे नियाेजन केल्यामुळे शहरात आलेल्या काेराेनाच्या लाटेवर पालिकेला तात्काळ नियंत्रण मिळवता आले आहे. मुलांच्या लसीकरणासाठी पालिकेने 225 शाळांत लसीकरणाचे नियाेजन केले असून, लसपात्र नागरिक व मुलांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे, असे पालिकेच्या लसीकरण प्रमुख डाॅ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.