शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश अर्जास 7 जुलैपर्यंत मुदतवाढ

    05-Jul-2022
Total Views |
 
 
 

Admission 
चाैदा तंत्रनिकेतनांत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरू राज्यातील 14 शासकीय पाॅलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरू असून, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागाने केले आहे. या पाॅलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास 7 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.हिंगाेली, जालना, अंबड (जि.जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रह्मपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा) आणि साेलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनात (पाॅलिटेक्निक), तसेच शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्थेत (मुंबई) अल्पसंख्यकांसाठी विशेष तुकडी सुरू असून, त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.या विशेष तुकड्यांत अल्पसंख्याकांसाठी 1155 जागा उपलब्ध असून, याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित तंत्रनिकेतनमध्येही प्रवेशाचा हक्क आहे. विशेष तुकड्यांत मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत.
 
मेकॅनिकल, सिव्हिल, काॅम्प्युटर, आयटी, इलेक्ट्राॅनिक्स, प्रिंटिंग टेक्नाॅलाॅजी अशा विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. विशेष तुकड्यांत अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 30 टक्के जागा उपलब्ध आहेत.इच्छुक विद्यार्थ्यांना वार्षिक 7750 रुपये इतक्या अत्यल्प शुल्कात प्रवेशाची संधी आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचीही संधी मिळणार असून, केंद्राच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक काैटुंबिक उत्पन्न मर्यादा 2 लाखांपर्यंत, तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी 8 लाख रुपयांपर्यंत आहे.अर्ज भरण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये, तर मागासवर्गीयांसाठी 300 रुपये इतके आहे. प्रवेशासाठी ऑनलाइन नाेंदणी कालावधी 7 जुलैपर्यंत आहे.अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https:// poly22.dte.maharashtra.gov.in तसेच 022-68597430, 8698781669, 8698742360 या क्रमांकावर संपर्क साधावा.