पुणे, 22 जुलै (आ.प्र.) :
संतांची मांदियाळी का झाली, तर परमात्मा पांडुरंगरूपाने प्रकट झाला म्हणूनच झाली. जगद्गुरू तुकाराम महाराजांना वृक्षवल्लींमध्ये पांडुरंग दिसले. परमेेशर व जीव यांमध्ये नांदणारी आनंद प्रतीती म्हणजे संत. नीजज्ञानाची सुख भोग अवस्था म्हणजे संत होय, असे मत चिन्मय महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात चिन्मय महाराज सातारकर यांनी जगद्गरू तुकाराम महाराजांचे निवडक अभंग या विषयावर निरुपण केले. चिन्मय महाराज सातारकर म्हणाले, की परमेेशराने जगत निर्माण केले असे नाही, तर परमेेशरच जगत आहे. परमेेशर जगतात विस्तार पावलेला आहे. त्यामुळे परमेेशर कुठे आणि जगत कुठे हे सांगताच येत नाही. जगत, जीव, परमात्मा सगळे एकच आहे. भिन्न रूपाने प्रकट झाले म्हणजे स्वरूप बदलले असे नाही. चातुर्मास प्रवचनांतर्गत संपूर्ण हरिपाठ या विषयावर 17 ते 31 जुलैदरम्यान रोज सायंकाळी 7 ते 8 यावेळेत प्रवचने होत आहेत. यात बाबामहाराज सातारकर, चिन्मय महाराज सातारकर व भगवतीताई सातारकर-दांडेकर निरूपण करत आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.