महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे : फडणवीस

14 Jul 2022 12:21:33
 
 
 
 

Law 
 
न्याय व विधी क्षेत्रात वैश्विक मान्यता असणारे मनुष्यबळ नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातून तयार हाेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठ त्यासाठी सहायक ठरावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुलामुलींचे वसतिगृह व सुविधा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बाेलत हाेते. नागपूरच्या बुटीबाेरी परिसरातील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या परिसरात आयाेजित या साेहळ्यात सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, तसेच या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांच्या हस्ते मुलामुलींच्या वेगवेगळ्या वसतिगृहांचे व सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले. या वेळी केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलाेर, कुलगुरु डाॅ. विजेंद्रकुमार, अधिष्ठाता आशिष दीक्षित उपस्थित हाेते.
 
नागपूर आता एज्युकेशन हब बनते आहे. मिहानमध्ये माेठ्या प्रमाणात आयटी कंपन्या येत आहेत. बुटीबाेरी ते कन्हान हा मेट्राे मार्ग सुरु हाेणार आहे.या मार्गावर विधी विद्यापीठासाठी विशेष थांबा तयार करण्यात येणार असल्याची घाेषणा गडकरी यांनी केली. न्यायव्यवस्था अतिशय बळकट, दर्जेदार असणे लाेकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाला जागतिक दर्जाची ओळख बहाल करा, असे आवाहनही त्यांनी केले.न्या. भूषण गवई यांनी दर्जेदार शिक्षणाचे केंद्र उभे राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कुलगुरू डाॅ. विजेंद्रकुमार यांनी प्रास्ताविक केले. न्या.शुक्रे, न्या. नरसिंहा, न्या. किलाेर यांनीही मनाेगत व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0