राज्यात नियाेजित वेळेनुसारच सुरू हाेणार शाळा : वर्षां गायकवाड यांची माहिती

    09-Jun-2022
Total Views |
 
 
 

Education 
 
नवे शैक्षणिक वर्ष सुरू हाेण्याच्या ताेंडावर राज्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढू लागली असून, शाळा सुरू हाेण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा नियाेजित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येतील. सल्लागार मंडळाशी चर्चा करून शाळांना कशी काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. यंदाही विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागांतील राज्य मंडळाच्या शाळा 15 जूनपासून, तर विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. मात्र, आता मुंबई, ठाणे, पुणे या शहरांत काेराेना रुग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर यंदा तरी प्रत्यक्ष शाळा सुरू हाेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मात्र, शाळा नियाेजित वेळापत्रकानुसार सुरू हाेतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.गेली दाेन वर्षे प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.त्यामुळे आता शाळा बंद ठेवणे याेग्य हाेणार नाही. शाळा सुरू करण्यापूर्वी कृती दलाशी (टास्क फाेर्स) चर्चा करून नियमावली जाहीर करण्यात येईल. आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येतील. शाळांत शिक्षक, विद्यार्थ्यांना मुखपट्टी बंधनकारक करावी का याबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले. गेली दाेन वर्षे प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आता शाळा बंद ठेवणे याेग्य हाेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.