मुंबई पालिकेच्या शाळांना पालकांचा वाढता प्रतिसाद

    03-Jun-2022
Total Views |
 
 
विद्यार्थिस्नेही उपक्रमांचा परिणाम : 35 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
 

Mumbai 
 
सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांच्या शाळा आणि इंटरनॅशनल स्कूलमधील प्रवेश क्षमतेला मागे टाकत यंदा मुंबई महापालिकेच्या शाळांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे.आतापर्यंत सुमारे 35 हजार विद्यार्थ्यांनी पालिका शाळांत प्रवेश घेतला आहे.महापालिकेने सुरू केलेले इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या शाळा, शाळांच्या इमारतींची डागडुजी, पायाभूत सुविधांसह अन्य शैक्षणिक साेयींमधील लक्षणीय सुधारणा आणि दैनंदिन शैक्षणिक कामकाजात विद्यार्थिस्नेही उपक्रमांचा समावेश, यामुळे पालकांनी महापालिकेच्या शाळांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची घटणारी संख्या हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय हाेता. घटत्या पटसंख्येमुळे अनेक शाळा बंद कराव्या लागतील, अशी भाकिते करण्यात येत हाेती. मात्र, आता चित्र पालटत असून, पालिकेच्या शाळांना पालक पसंती देत आहेत.
टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षांत पालिकेच्या शाळांत 29 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता.
 
यंदाही विद्यार्थ्यांचा ओघ अधिक आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत 35 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेश प्रक्रिया जुलैपर्यंत चालणार असल्याने विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पालिकेमार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुफारे 1150 शाळांत सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाने अनेक प्रयाेग केले. आभासी वर्ग (व्हर्च्युअल क्लासरूम) सुरू केले. विद्यार्थ्यांना माेफत टॅब दिले.सीबीएसई, आयसीएसई मंडळांशी शाळा संलग्न करण्यात आल्या.विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आयबी आणि केंब्रिज या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी करार करण्यात आला. त्यामुळे यंदा नव्या एक लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या शिक्षण विभागाने ठेवले आहे.