वर्षभरात लाेकलमधील महिलांच्या डब्यांत सीसीटीव्ही बसविणार

    27-Jun-2022
Total Views |
 
 
 

Local 
रेल्वे प्रशासनाकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेची महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययाेजना केली जाणार प्रवासादरम्यान महिलांशी संबंधित हाेणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लाेकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला हाेता. आतापर्यंत 323 महिला डब्यांत सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, पुढील वर्षभरात सर्वच महिला डब्यांत कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण हाेईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.प्रवासादरम्यान महिलांवर हाेणारे हल्ले, करण्यात येणारी छेडछाड, विनयभंग आदी घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेसाठी लाेकलमधील महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला हाेता. प्रथम पश्चिम रेल्वेने 2015 मध्ये महिलांच्या डब्यांत कॅमेरे बसवण्यास सुरुवात केल्यानंतर मध्य रेल्वेनेही हा प्रकल्प राबवला. बारा डब्यांच्या एका लाेकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणीचे तीन डबे आणि प्रथम श्रेणीचे तीन छाेटे डबे असतात. यातील प्रत्येक डब्यात एक-दाेन कॅमेरे बसवण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवरील 156 लाेकलच्या महिला डब्यांत एकूण 744 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियाेजन आहे.
 
मध्य रेल्वेवरील लाेकलच्या 183 महिला डब्यांत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात 589 महिला डब्यांत कॅमेरे बसवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील सुमारे 41 लाेकलमधील 140 महिला डब्यांत कॅमेरे बसवण्यात आले असून, येत्या वर्षभरात उर्वरित लाेकलमधील महिलांच्या डब्यांत कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर 1990 मध्ये 69 लाेकल हाेत्या आणि दिवसाला 1023 लाेकल फेऱ्या हाेत हाेत्या. 2010 मध्ये लाेकल गाड्यांची संख्या 111 झाली आणि फेऱ्या 1462 झाल्या. 2018 पासून 134 लाेकल गाड्या ताफ्यात असून, दिवसाला 1774 फेऱ्या हाेऊ लागल्या. आता लाेकलची संख्या 156 वर गेली असून, फेऱ्यांतही वाढ हाेऊ लागली आहे. त्यामुळे डब्यांची संख्याही वाढली आहे; तसेच गेल्या काही वर्षांत पश्चिम रेल्वेवरील लाेकलच्या संख्येतही वाढ झाली आहे.