कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरल्यास कारवाई

घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश

    26-Jun-2022
Total Views |
 
MANPA
 
 
पुणे, 25 जून, (आज का आनंद न्यूज नेटवर्क)
 
ः येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका सरसावली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांना प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करतानाच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्यात यापूर्वीच 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे.
 
यानंतरही या पिशव्यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास अगोदर दंडात्मक कारवाई आणि पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; परंतु या कारवाईमध्ये सातत्य नसल्याचे पाहायला मिळत असून, बाजारपेठेत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसत आहे. अशातच केंद्र सरकारनेच संपूर्ण देशभरामध्ये 1 जुलैपासून प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरील कारवाईला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. शहरातील प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रमुख आशा राऊत म्हणाल्या, की राज्य शासनाच्या आदेशानुसार 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व आरोग्य निरीक्षकांमार्फत संयुक्त कारवाई करण्यात येते.
 
दररोज 20 ते 25 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात येत आहे. प्रशासनाने यापूर्वी देखील शहरात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांची निर्मिती करणारे उद्योग आणि विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून शेकडो किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्तही करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाला मारक असलेला प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी महापालिकेकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते. नुकतेच पालखी सोहळ्यामध्ये देखील प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. एकदा कारवाई केल्यानंतर पुनरावृत्ती करणाऱ्या विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे राऊत यांनी नमूद केले.
 
 गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी
 
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. मूर्तीकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळावा, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. या संदर्भात गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही बाहेरील जिल्ह्यांतून अथवा राज्यातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. घरच्या घरी गणेश विसर्जन अथवा मूर्तिदानाला प्राधान्य देण्याबाबत पुणेकरांचा प्रतिसाद वाढत आहे. यंदाही नागरिकांनी नैसर्गिक प्रवाहात अर्थात नदी, कालवा, तलाव आणि विहिरीमध्ये मूर्तींचे विसर्जन करू नये. त्याऐवजी घरच्या घरी मूर्ती विसर्जन अथवा मूर्तिदान करावे, असे आवाहन आहे. घरच्या घरी मूर्ती विसर्जनासाठी महापालिका गेली काही वर्षे नागरिकांना अमोनियमबाय कार्बोनेट मोफत उपलब्ध करून देत आहे. महापालिकेकडे त्याचा पुरेसा साठा असल्याने यंदा खरेदी केली जाणार नाही. -
 
आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा विभाग