अधिकाऱ्यांनी शासनाचे दूत म्हणून काम करावे

माजी खासदार प्रदीप रावत यांचे प्रतिपादन

    25-Jun-2022
Total Views |
 
TAKWALE
 
 
पुणे, 24 जून (आ.प्र.) :
 
जनतेचे प्रश्‍न सहजतेने सोडवून लोकाभिमुख सेवेसाठी शासकीय अधिकाऱ्यांनी शासन आणि प्रशासन यांचा दूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरचे विश्‍वस्त तथा माजी खासदार प्रदीप रावत यांनी येथे केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि अनंतकुमार संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने नवलमल फिरोदिया सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अनंतकुमार ताकवाले यांच्या ऋणानुबंध-कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार प्रदीप रावत, पासपोर्ट अधिकारी अनंतकुमार ताकवाले, संयोजक श्‍याम देशपांडे, भांडारकर इन्स्टिट्यूटचे प्रमुख भूपाल पटवर्धन, प्राचार्य भाऊसाहेब जाधव, सपना अनंतकुमार ताकवले, विनायक भोसले, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. रावत म्हणाले, की समाज उंचाविण्यासाठी समाजातील सर्वच क्षेत्रांतील लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपला समाज उंचावेल, अशा प्रकारचा प्रयत्न पासपोर्ट अधिकारी म्हणून काम करताना अनंतकुमार ताकवले यांनी केला, ही बाब निश्चितच कौतुकास्पद व भूषणावह आहे. आपल्या कार्यभूमीला मायभूमी समजून कार्य करण्याची ताकवाले यांची पद्धत खूपच चांगली आहे. अनंतकुमार हे अत्यंत निर्मळ आणि संस्कारित मनाचे अधिकारी आहेत.
 
यशाचे सर्व श्रेय सहकारी व सहघटकांना ः अनंतकुमार
 
 या प्रसंगी अनंतकुमार ताकवाले यांनी, पुणे येथील कार्यकाळात केलेल्या सर्व कामांचे श्रेय आपले सहकारी व सहघटकांना देऊन आपल्या मनाचा मोठेपणा सिद्ध केला. शासकीय सेवेत काम करताना संविधानाने दिलेल्या विशेष अधिकारासोबत जनतेला मिळालेल्या मूलभूत अधिकाराचीही जाणीव ठेवली पाहिजे. शासकीय सेवेत काम करताना समाजाचे ऋण मान्य करत कोणत्याही आव्हानास आपण सकारात्मकतेने सामोरे जाऊ शकतो, असे या वेळी अनंतकुमार ताकवाले यांनी सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या बालपणापासूनचा संघर्षाचा प्रवास, त्यांना वेळोवेळी भेटलेले मार्गदर्शक आणि मार्गदर्शन यामुळे आपण भाग्यवान आहोत, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.
प्रशासकीय सेवेत प्रथम उत्तराखंड या राज्यात काम सुरू केले. वारंवार बदल्यांही झाल्या, प्रत्येक वेळी झालेल्या बदल्यांना संधी म्हणून स्वीकारून जवळपास संपूर्ण उत्तराखंड फिरलो. उत्तराखंड राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कामाची संधी मिळाली. या संधीचा समाजातील गरजू लोकांकरिता लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न केल्याचेही ताकवाले यांनी सांगितले. या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम यादीत निवड झालेले विनायक भोसले यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्‍याम देशपांडे यांनी केले. तेजस्वी कांबळे यांनी ताकवाले यांच्या मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल-श्रीफळ देऊन ताकवाले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि ताकवाले यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता