चाकणच्या कामगार विमा रुग्णालयास मंजुरी

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश

    22-Jun-2022
Total Views |
 
karmchari
 
 
 
चाकण, 21 जून (आ.प्र.) :
 
औद्योगिक वसाहतीतील वाढती कामगारसंख्या लक्षात घेऊन चाकण येथे 100 खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास ईएसआय कॉर्पोरेशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. चाकण एमआयडीसी क्षेत्रात शेकडो कंपन्या उभ्या राहिल्या. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ईएसआयची रक्कम कापून घेतली जात होती; परंतु कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात किंवा खासगी रुग्णालयात जावे लागत होते.
त्यामुळे चाकण येथे कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय श्रममंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पत्र खासदार डॉ. कोल्हे यांना पाठवले होते. श्रममंत्री यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ईएसआय कॉर्पोरेशन, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या 188व्या बैठकीत महाराष्ट्रातील चाकण, पालघर, सातारा, पेण, जळगाव आणि पनवेलसह देशभरात 23 नवीन 100 खाटांची रुग्णालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली.
त्यामुळे चाकण एमआयडीसी क्षेत्रातील लाखो कामगारांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, खासदार डॉ. कोल्हे यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासूनची कामगारांची मागणी पूर्ण होणार आहे. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, चाकण एमआयडीसीची निर्मिती होऊन 15 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांच्या वेतनातून दरमहा कोट्यवधी रुपये ईएसआय कार्पोरेशनकडे जमा होतात.
मात्र त्या बदल्यात कामगारांना स्थानिक स्तरावर ईएसआय रुग्णालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोविडच्या काळात कामगारांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव या सर्व एमआयडीसीतील कामगारांसाठी मध्यवर्ती अशा चाकण परिसरात कामगार विमा रुग्णालय आवश्‍यक आहे. या विचारातूनच मी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत होतो.