फाईव्ह स्टार हाॅटेल काढण्यासाठी शेतकऱ्याने मागितले 5 काेटींचे कर्ज!

    21-Jun-2022
Total Views |
 
 
 

loan 
शेतमालाला याेग्य भाव न मिळाल्यामुळेही शेतकऱ्यांना कवडीमाेल दराने आपला माल विकावा लागताे. या दृष्टचक्रातून सुटका करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नामी शक्कल लढवली आहे.आदिवासी भागातील चांगेफळ गावातील एका अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रत्येकी साडेपाच काेटींच्या कर्जाची मागणी केल्याचे प्रकरण समाेर आले आहे. या कर्जासाठीचा अर्ज या शेतकऱ्याने बँकेच्या व्यवस्थापकांकडे दिला आहे. इतक्या कर्जाची मागणी झाल्यामुळे बँक अधिकारीही चक्रावून गेले आहेत.काेट्यवधींच्या कर्जाची मागणी केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव शुभम इंगळे असे आहे. त्याचे म्हणणे आहे की, मी अल्पभूधारक शेतकरी असून, मला शेतीत काहीही प्रगती करता आली नाही, मी अनेक व्यवसाय करून बघितले पण मला त्यात यश आले नाही. त्यामुळे मला पंचतारांकित हाॅटेल बांधायचं आहे.
 
सध्या देशात निवडणुकीचे वातावरण असले, की पंचतारांकित हाॅटेलचा व्यवसाय जाेमात असताे.देशात काेणतीही निवडणूक आली की, राजकीय पक्ष हे माझ्या भागातील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य यांना माझ्या हाॅटेलमध्ये आश्रयाला ठेवतील व त्यातून मला उत्पन्न मिळाले, की मी बँकेचे कर्ज परतफेड करेन, असं त्यांनी सांगितलं आहे. जरी या तरुण शेतकऱ्याने अशक्य असे कर्ज मागितले असले, तरी यातून मात्र आपल्या व्यवस्थेचं अपयश नक्कीच दिसून येत आहे.राज्यसभा असाे की सत्ता स्थापन करतानाची राजकीय पक्षांच्या कसरतीमध्ये लाेकप्रतिनिधींची दिवाळी असते.राजकीय पक्ष आपल्या लाेकप्रतिनिधींना पंचताराकिंत हाॅटेलमध्ये आश्रयास ठेवतात. ही आता प्रथाच बनून राहिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकांवेळी हाॅटेलमध्ये डांबून ठेवलेले आमदार असाे की आता विधान परिषदेसाठी आमदारांना दिलेला आदेश असाे, यामुळे पंचतारांकित हाॅटेल चालकांची दिवाळी असते.