देशातील सर्वाेत्तम कामगिरीसाठी स्काॅच संस्थेतर्फे दिला जाणारा प्रथम पुरस्कार मिळाल्याने राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राेवला गेला. या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डाॅ.नितीन राऊत यांचे, तर ऊर्जामंत्री डाॅ. राऊत यांनी ऊर्जा विभागातील सर्व अधिकारीकर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या महापारेषणने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स स्काॅच अॅवाॅर्ड इन पाॅवर अँड एनर्जी’ या पुरस्काराने गाैरवण्यात आले. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद कामगिरी असून, या पुरस्काराबाबत डाॅ. राऊत यांनी महापारेषणचे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. येथे झालेल्या कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महापारेषणतर्फे ड्राेनचा वापर करून दुर्गम भागातील अतिउच्चदाब वाहिन्यांचे सर्वेक्षण आणि देखरेख करण्यात येत आहे. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयाेग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ केली. माेनाेपाेल मनाेऱ्यांचा वापर सुरू केला. परिणामी, वहिवाट मार्गाची समस्या कमी करण्यात व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला. एचव्हीडीसी याेजनेत 1 लाख 29 हजार 546 कृषिपंप ऊर्जान्वित झाले. मुख्यमंत्री साैर कृषिपंप याेजनेत 99744 कृषिपंप बसवण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश याेजनेत अनुसूचित जाती-जमाती व भटक्या विमु्नत घटकांसाठी 12102 घरगुती वीजजाेडण्या देण्यात आल्या.