आपल्या चुका शाेधल्या, तर अचूक काम हाेईल

    20-Jun-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 
 

mistakes 
काही मिळवायचे, यशस्वी व्हायचे, तर करावे लागतात प्रयत्न. कष्ट आणि प्रयत्नांना काेणताही शाॅर्टकट नसताे. कामे सगळीच महत्त्वाची असली, तरी काही जास्त माेलाची असतात आणि ते माहीत असल्यामुळे आपण जास्तीत जास्त काैशल्याचा वापर करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करताे. पण, तरीही काही वेळा मनासारखे हाेत नाही. मग काय चुकले याचा विचार करण्यात औदासीन्य येते. आपण प्रयत्नांत कमी पडलेलाे नसलाे, तरी अनेकदा अशी वेळ येते. घरात, कुटुंबात शांतता असावी, नातेसंबंध दृढ असावेत आणि नाेकरीत समाधान असावे अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. पण, काेठे तरी काही तरी चुकते आणि समस्या निर्माण हाेतात.खूप प्रयत्न करूनही आपल्या आवडीच्या क्षेत्रात सुधारणा न करता येणे ही एक सर्वसामान्य समस्या आहे. लेखक आणि लर्निंगतज्ज्ञ एदुआदा ब्रेसिनाे यांनी या विषयाचा अभ्यास केला असून, आपली मेहनत यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी दाेन विभाग केले आहेत. शिकणे आणि कृती करणे (लर्निंग अँड परफाॅर्मिंग झाेन) अशी त्यांची नावे आहेत.
 
‘परफाॅर्मिंग झाेन’मध्ये आपले लक्ष्य काम अचूकतेने पूर्ण करण्याचे असते, असे ते सांगतात. आपले या कामातील काैशल्य आणि ते पूर्वी केले असल्यास कसे करावे याची माहिती असल्यामुळे आपल्या चुका टाळून काम अचूक हाेते. पण ‘लर्निंग झाेन’मध्ये मात्र आपले लक्ष्य कामात सुधारणा करण्याकडे असते. काम जास्तीत जास्त अचूक कसे करता येईल याकडे आपले लक्ष राहते. या झाेनमध्ये कामात चुका हाेणे आणि त्या सुधारण्याची संधी असल्याचे एदुआर्दाे ब्रेसिनाे म्हणतात. आपल्या प्रगतीसाठी हे दाेन्ही झाेन आवश्यक असतात. नवीन काही शिकणे आणि त्यानुसार काम करणे यातून साध्य हाेते. ‘परफाॅर्मिंग झाेन’चा परिणाम आजच्या कामावर हाेताे, तर ‘लर्निंग झाेन’चा संबंध आपल्या भविष्याबराेबर असताे. अनेकदा आपण ‘परफाॅर्मिंग झाेन’वर जास्त वेळ घालविताे.
 
काही नवीन शिकत असताना आपण आपले नेहमीचे काम करत नसताे. नवीन काही शिकत असताना आपले लक्ष आपल्यातील त्रुटींवर असते. गायक असाे वा नर्तक; नवीन शिकत असताना त्यांचे लक्ष तिकडेच राहते.गायक असेल, तर ताे स्वरांचे बारकावे समजून घेताे आणि नर्तक असेल, तर ताे पावलांच्या लयीकडे लक्ष देताे. आपण कशात कमी पडताे आहाेत यावर ते नजर ठेवतात आणि त्याचा सराव करून त्यात पारंगत हाेण्याचा प्रयत्न करतात. शिकण्याच्या काळात आपण आपल्याला ‘कम्फर्ट झाेन’मधून बाहेर काढत असताे. सगळ्यांच क्षेत्रांत हा नियम लागू पडताे.नातेसंबंध जाेपासताना आपण आपले बाेलणेच खरे मानताे. पण ‘इम्प्रुव्हमेंट झाेन’मध्ये इतरांचे ऐकून घेण्याची सवय हाेत असल्याचे एदुआर्दाे ब्रेसिनाे म्हणतात. कार्यालयीन कामात अधिक काैशल्य मिळवायचे असेल, तर कामाची वेळ संपल्यावर तुम्ही एखादा ऑनलाइन काेर्स करावा किंवा तुमच्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञाच्या व्याख्यानाचा व्हिडिओ बघावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
 
लीडरशिप काेच आणि प्रेरक वक्ते असलेले राॅबिन शर्मा म्हणतात, ‘कठाेर मेहनतीला काेणताही पर्याय नसला, तरी आपले काम अधिक चांगले करण्यासाठी त्यातील बारकावे शिकायला हवेत. सहकाऱ्यांबराेबर बाेलून, अनुभवी लाेकांचा सल्ला घेऊन आणि नवे प्रयाेग करून कामात खूप सुधारणा करता येते.’ आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कामासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज असते.
त्यासाठी राेज काही वेळ त्या कामावर लक्ष केंद्रित करायला हवे. नेहमीची कामे झाल्यानंतर ‘लर्निंग झाेन’मध्ये जाऊन काही नवीन शिका आणि त्याचा वापर कामासाठी करा. चुका झाल्या तरी त्या सुधारण्याची संधी असते हे लक्षात ठेवा. ‘आपल्या कामाबराेबर संबंधित असलेले जेवढे बारकावे आपण आत्मसात करताे, तेवढे आपले काम अचूक हाेत जाते,’ असे एदुआर्दाे ब्रेसिनाे यांनी स्पष्ट केले आहे.आपली मेहनत कधी वाया जात नाही हे लक्षात घ्या आणि अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमची प्रगती हाेत जाईल, असे ते सांगतात.