डाॅ. आंबेडकर स्मारकाच्या पादपीठाचे काम पूर्णत्वाकडे

    17-Jun-2022
Total Views |

Indumill
मुंबईतील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे सनियंत्रण व काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आदी मान्यवरांनी इंदू मिल स्मारक कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.या स्मारकात डाॅ. आंबेडकरांचा पुतळा जेथे बसवण्यात येणार आहे, त्याच्या पादपीठाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असून, पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृतीही लवकरच अंतिम करण्यात येणार आहे, असे सांगत मुंडे यांनी एकूण कामाबाबत समाधान व्यक्त केले.
 
मुंडे यांच्यासह प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसाेडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे, शिल्पकार अनिल राम सुतार, समीर अनिल सुतार, संजय पाटील, आर्किटेक्ट शशी प्रभू, इतिहासतज्ज्ञ डाॅ. आर. मालाणी, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. विश्वनाथ सहारे आदी उपस्थित हाेते. किनारी वातावरण, वातावरणातील बदल, पावसाळ्यातील कामाची गती आदी बाबी विचारात घेऊन दैनंदिन कामांचा तक्ता बनवून त्यावर अंमल करावा, अशा सूचना मुंडे यांनी दिल्या.