एनडीएत माेठ्या उत्साहात दीक्षान्त संचलन

    01-Jun-2022
Total Views |
 
 

NDA 
हवाई दल प्रमुखांची उपस्थिती : प्रशिक्षण पूर्ण केलेले 321 स्नातक सेवेत दाखल राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीतील (एनडीए) प्रशिक्षण पूर्ण करून 321 स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू हाेण्याची शपथ घेतली. या वेळी प्रबाेधिनीच्या प्रसिद्ध खेत्रपाल मैदानावर झालेल्या दिमाखदार दीक्षांत संचलनाचे प्रमुख निरीक्षक म्हणून हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चाैधरी उपस्थित हाेते. या वेळी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, एनडीएचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल अजय काेचर आणि उपप्रमुख, तसेच मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल संजीव डाेगरा उपस्थित हाेते.प्रबाेधिनीतून 40 वर्षांपूर्वी मी माझे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आज दीक्षांत संचलनाचा प्रमुख निरीक्षक म्हणून उपस्थित राहताना त्या वेळच्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे.
तंत्रज्ञानातील प्रगतीबराेबरच युद्धाचे आयामही बदलत आहेत. या बदलत्या स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा, अशा शब्दांत एअर चीफ मार्शल चाैधरी यांनी प्रबाेधिनीच्या 142व्या तुकडीला शुभेच्छा दिल्या.
 
एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान सर्वाे त्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्नातकांना एअर चीफ मार्शल चाैधरी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. अभिमन्यू सिंह राठाेडने राष्ट्रपती सुवर्ण पदकावर, तर अरविंद चाैहानने राैप्य पदकावर आपले नाव काेरले. नितीन शर्माला ब्राँझ पदकाने गाैरवण्यात आले. सर्वाेत्कृष्ट कामगिरीसाठी माईक स्क्वाॅड्रनला चीफ ऑफ स्टाफ बॅनर प्रदान करण्यात आला.
युद्धसामग्री आणि तंत्रज्ञानासाठी भारत रशियावर माेठ्या प्रमाणावर अवलंबून राहिला आहे. मात्र, यापुढे आत्मनिर्भर धाेरण अंगिकारल्यानंतर संरक्षण सामग्रीसाठी परावलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न तिन्ही दलांकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी माेठ्या प्रमाणावर भारतीय कंपन्यांबराेबर काम केले जात आहे. तिन्ही दलांनी या कामी पुढाकार घेतला असून, काेणती सामग्री आयात करायची आणि काेणती कटाक्षाने स्वदेशी असेल याची यादीही तयार करण्यात आली आहे, असे एअर चीफ मार्शल चाैधरी यांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.