काेणी मदत केल्यास त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा

26 Feb 2022 17:40:07
 
 
 
संध्यानंद.काॅम
 

gratitude 
 
मानवी मनातील असंख्य भावनांपैकी एक आहे कृतज्ञता. आपल्याला गरज असताना काेणी तरी आपल्या मदतीला येतात आणि समस्या सुटते.शब्दाएवढीच ‘कृतज्ञता’ ही एक फार सुंदर भावना आहे. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे आभार मानणे, त्याच्या मदतीची जाण ठेवणे. ही भावना काेणाबाबतही असू शकते. तुमचा जाेडीदार, मित्र किंवा कार्यालयीन कामातीलसहकारी. पण आपण ही भावना कधी व्यक्त केली हाेती हे अनेकांच्या लक्षातही नसते.काही वेळा ई-मेल अथवा पत्राच्या रूपाने औपचारिक आभार व्यक्त केले जातात; पण त्यात प्रत्यक्ष बाेलण्याचा गाेडवा नसताे. सध्याच्या धावपळीच्या काळात आपण कृतज्ञता व्यक्त करायलाच विसरायला लागलाे आहाेत. आत्मकेंद्रित वृत्ती वाढायला लागल्यामुळे असे घडते.
 
गेल्या काही वर्षांपासून कृतज्ञतेची भावना पुन्हा वाढीस लागल्याचे मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. कृतज्ञतेचा संबंध आपल्या आनंद आणि भावनिक आराेग्याबराेबरसुद्धा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. इतरांबाबत नेहमी कृतज्ञ असलेले लाेक सकारात्मक असतात, ते नियमित व्यायाम करतात, त्यांच्या सहकाऱ्यांना प्राेत्साहन देऊन ते त्यांची उत्पादनक्षमता वाढवितात आणि अशा लाेकांचे सर्वांबराेबर चांगले संबंध असतात हेही सिद्ध झाले आहे.अशा लाेकांचे भावनात्मक आराेग्य इतरांपेक्षा चांगले असते आणि कसाेटीच्या प्रसंगांत ते याेग्य प्रकारे मार्ग काढतात. या संदर्भात एक प्रयाेग करण्यात आला हाेता. आपल्याला काेणीतरी मदत केली हाेती, पण आपण त्या व्यक्तीचे आभार मानले नाहीत अशी कल्पना करून मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र पाठवावे, असे प्रयाेगातील सहभागींना सांगितले गेले.
 
तसे केल्यावर सहभागींच्या आनंदाची पातळी एका महिन्यात वाढल्याचे दिसले.कृतज्ञता किती महत्त्वाची हे या उदाहरणातून लक्षात येते. ती दैनंदिन जीवनात कशी अमलात आणावी हे पाहा. एक साेपा मार्ग म्हणजे दैनंदिनी लेखन. त्यात आपल्याला काेणी कशी मदत केली याची नाेंद राेज करा.याचा फायदा म्हणजे, तुम्ही अशा लाेकांना कधी विसरणार नाही आणि त्यांच्याबाबत कृतज्ञ राहायला शिकाल. मदत करणारी व्यक्ती वयाने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असेल, तर तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबद्दल ती तुम्हाला शुभाशीर्वाद देईल आणि तुमच्यापेक्षा लहान असेल, तर तुम्ही त्याला किंवा तिला शुभाशीर्वाद द्याल. ती मुलगी अथवा मुलगा त्यामुळे आनंदी राहतील. तुमच्या दैनंदिन याेगाभ्यासातसुद्धा तुम्ही कृतज्ञतेचा समावेश करू शकता.
 
त्यासाठी आधी मनात ही भावना आणावी लागेल. यालाच ‘संकल्प’ म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ताे करायला हवा. याची दैनंदिन जीवनात सवय केलीत तर तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. हा संकल्प म्हणजे तुम्ही स्वत:ला दिलेले वचन असल्याचे लक्षात ठेवल्यावर त्याचे पालन करण्यात अडचण येणार नाही. उदा. तुमच्या आयुष्यातील दाेन-तीन प्रसंगांत तुम्हाला मिळालेली मदत विचारात घ्या. त्याचा विचार करायला लागल्यावर आपाेआपच मनात कृतज्ञतेची भावना येऊ लागते.तुमचे मन शांत व्हायला लागते आणि समाधान वाढत जाते.नमस्कार मुद्रेचाही वापर करता येताे. तुमचे हातांचे तळवे नमस्काराच्या स्थितीत आणा आणि दाेन्ही अंगठे उराेस्थीला (छातीचे हाड-स्टर्नम) लावा.
 
या स्थितीत तुमच्या हृदयात कृतज्ञतेची भावना निर्माण हाेते. नमस्काराच्या स्थितीत जाेडलेले हात छातीला चिकटलेले असल्यामुळे तुम्हाला कृतज्ञतेच्या भावनेची अनुभूती मिळते. या स्थितीत असताना श्वासांची संख्या माेजण्याऐवजी कृतज्ञतेच्या भावनेकडे लक्ष द्या. आपण काेणाबाबत आणि कशासाठी कृतज्ञता व्यक्त करत आहाेत हे जाणून घ्या. या स्थितीच्या चरम सीमेवर असताना आपल्याला आजवर जे काही मिळाले त्याबद्दल आभार माना. त्यात तुमच्या शरीराचाही समावेश असताे. आपले शरीर आहे तसे स्वीकारा आणि त्याला दाेष देणे, त्याच्यावर टीका करणे थांबवा. याच शरीराने तुम्हाला सदैव साथ दिली आहे हे विसरू नका. स्वत:बाबत कृतज्ञ राहणेसुद्धा फार उपयुक्त ठरते.ही भावना केवळ स्वत:बाबतच नकाे, तर तुमचा जाेडीदार, कुटुंबीय आणि समाजातील सर्वांबराेबरही बाळगायला हवी. देशही त्यात असताे. या सर्वांबाबत कृतज्ञता बाळगल्याने तुम्ही शांत हाेता. नकारात्मक विचार बंद करा आणि राजकारणापासून दूर राहा.
Powered By Sangraha 9.0