नाशिकच्या वैद्यकीय संस्थांसाठी 348 काेटी मंजूर

03 Dec 2022 14:47:03
 

Nashik 
 
गिरीश महाजन यांची माहिती : माफक दरात मिळणार विशेषाेपचारांची सुविधा नाशिक शहरातील लाेकसंख्या विचारात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संस्था स्थापन करण्यात आली आहे. या दाेन्हींसाठी शासन निर्णयान्वये 348 काेटींच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संस्था स्थापन करण्यासाठी 2016-2019 या कालावधीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली हाेती.यानंतर या दाेन्ही संस्था सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत हाेता. 5 एप्रिल 2021 राेजीच्या शासन निर्णयानुसार नाशिकला 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय, तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संस्था स्थापन करण्यात आली.
 
त्यामुळे रुग्णांना मुंबई किंवा पुण्याऐवजी नाशिकमध्येच विविध आजारांवरील विशेषाेपचार व अतिविशेषाेपचार साेय उपलब्ध हाेणार आहे. ताज्या शासन निर्णयानुसार या दाेन्हींसाठी 348 काेटींची तरतूद करण्यात आली आहे.नाशिकमध्ये शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन हाेण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर यांनी पाठपुरावा केला.नाशिककरांना त्यांच्या शहरातच विशेषाेपचार व अतिविशेषाेपचार सुविधा शासनाच्या माध्यमातून माफक दरात उपलब्ध हाेतील. तसेच, दरवर्षी नवीन 100 डाॅक्टर नागरिकांसाठी उपलब्ध हाेणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0