शैक्षणिक संस्थांनी आदर्श विद्यार्थी घडवावेत : मुख्यमंत्री

    02-Dec-2022
Total Views |
 
 

Education 
विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. शैक्षणिक संस्थांनी दर्जेदार शिक्षणातून आदर्श विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक संस्थांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यासाठी, तसेच विद्यमान शाळांच्या दर्जावाढीसाठी इरादापत्रे आणि मान्यतापत्रे प्रदान केली जात आहेत. हा पारदर्शक पायंडा सुरू झाल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक संस्थांना शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम व नियमातील तरतुदींनुसार निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांना मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते इरादापत्रे आणि मान्यतापत्रे प्रदान करण्यात आली.
 
त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई व इतर मंडळांच्या संलग्नतेसाठी ना हरकत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या वेळी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियान संचालक कैलास पगारे, उपसचिव समीर सावंत यांच्यासह स्वयंअर्थसहाय्यित शाळाचालक उपस्थित हाेते.नागरिकशास्त्राचा अभ्यास करताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा या दृष्टीने विधान मंडळामार्फत विद्यार्थ्यांना संसदीय कामकाज पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. नार्वेकर यांनी केले.स्वयंअर्थसहाय्यित संस्थांनी देशाच्या प्रगतीत हातभार लावणे गरजेचे असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात 22 मान्यतापत्रे, 123 इरादापत्रे व 19 ना-हरकत प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.