कमांडर जाेधा यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाैरव

    28-Nov-2022
Total Views |
 
 
 
 
commander
मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना ‘गेट वे’वरील कार्यक्रमात आदरांजली 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेले पाेलिस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.पाेलिस बाॅइज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पाेलिस बाॅइज संघटनेतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे 26/11 हल्ल्यातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पाेलिसांचा आणि कर्मचाऱ्यांचा विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर व पर्यटनमंत्री मंगलप्रभात लाेढा यांच्या हस्ते गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आला.
 
26/11च्या ताज हाॅटेलवरील हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत कमांडर सुनील जाेधा यांनी 7 गाेळ्या अंगावर झेलून ताज हाॅटेलमधील नागरिकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न केले हाेते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुनील जाेधा यांना सन्मानित करण्यात आले.या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे विशेष काैतुक केले. आज एक गाेळी त्यांच्या शरीरामध्येच असल्याचे कमांडर जाेधा यांनी सांगितले. शहीद पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई मशालीसह शहीद दाैडचे आयाेजन करण्यात आले हाेते.सांगलीतील 25 तरुणांनी या हल्ल्यातील शहिदांना या वेगळ्या उपक्रमातून श्रद्धांजली वाहिली.