नव्या महाविद्यालयांनी राेजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा विचार करावा

    14-Nov-2022
Total Views |
 

Employment 
राज्य उच्च शिक्षण व विकास आयाेगाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांची सूचना नवीन महाविद्यालय सुरू करताना राेजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा विचार करून बहुपर्यायी अभ्यासक्रमांचे नियाेजन महाविद्यालयांनी करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृहात राज्य उच्च शिक्षण व विकास आयाेगाची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या मंत्रिगटासमाेर राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण करण्यात आले.
 
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्ताेगी, काैशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जाेशी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डाॅ. श्रीकर परदेशी बैठकीला उपस्थित हाेते.
 
सन 2023-24 या वर्षासाठीच्या वार्षिक याेजनेबाबत प्रस्तावित महाविद्यालयांच्या स्थळ बिंदूची भाैगाेलिक माहिती प्रणालीद्वारे सादरीकरण करण्यात आले. डाॅ. नरेंद्र जाधव समितीच्या मार्गदर्शक सूचनांवर चर्चा करून निकषात बसणाऱ्या नवीन महाविद्यालयाच्या स्थळबिंदूस यावेळी मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाच्या कृती अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या उप समित्यांनी अहवाल सादर केल्याची माहिती देण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाची राज्यात करण्यात येत असलेल्या अंमलबजावणीबाबत रस्ताेगी यांनी माहिती दिली.