अतिवृष्टी निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना 755 काेटींची मदत

    01-Oct-2022
Total Views |
 
 

CM 
 
मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय : पाच लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार लाभ अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांत बसत नसतानाही जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने माेठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे 755 काेटींची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.नैसर्गिक आपत्तीत बाधित आपदग्रस्तांना मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनाेज साैनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित हाेते.
 
नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे 4500 काेटींच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे.एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते, तर ती अवघी 1500 काेटी रुपये राहिली असती. त्यामुळे निकषापलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आतापर्यंत सुमारे 3900 काेटींच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे. काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून, सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.हे 30 लाख आणि नव्याने मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या 755 काेटींच्या निधीमुळे अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.