रत्नागिरीत यंदा आरतीविना हाेणार गणेशाेत्सव

    07-Sep-2021
Total Views |
 
 
जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांचे निर्देश : गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रमांवर निर्बंध
 

ganapati_1  H x 
 
 
काेकणातील गणेशाेत्सवाचे वैशिष्ट्य समजली जाणारी सामूहिक आरती, भजन, कीर्तन आणि महासंस्कृती भूषण असलेल्या जाखडी (बाल्या) नृत्याशिवायच यंदा काेकणात गणेशाेत्सव साजरा हाेणार आहे. गर्दी करणारे कार्यक्रम घेऊ नयेत, असे निर्देश रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केले आहेत.काेराेना लसीच्या दाेन मात्रा घेतलेल्या गणेशभक्तांना काेणत्याही प्रकारच्या चाचणीची आवश्यकता नाही. हा लसधारकांसाठी माेठा दिलासा आहे. मात्र, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल नसल्यास जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर काेराेना चाचणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. चाचणीसाठी नागरी कृतिदल तयार करण्यात आले आहे, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.
 
जिल्ह्यात सार्वजनिक गणपती बसवण्यात येऊ नयेत. बसवल्यास ताे केवळ दीड दिवसांचा असावा. आरती, भजन, कीर्तन, जाखडी नृत्यांसाठी गर्दी करू नये. गणपती दर्शनासाठी नातेवाईक, मित्रमंडळींच्या घरी जाऊ नये. गणेश विसर्जन घरातच करावे.घरात शक्य नसल्यास हाैद-कृत्रिम तलावात विसर्जन करावे. आगमन- विसर्जन मिरवणुका काढू नयेत, अशा लेखी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने काढल्या आहेत.महामार्गावरील प्रवेशद्वारावर चाचणी पथक नियुक्त केले आहे. रस्ते मार्गे येणाऱ्या प्रवाशांची तेथे तपासणी करण्यात येईल. रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यात येईल. सध्या गावपातळीवर राेज सरासरी चार ते साडेचार हजार नागरिकांची चाचणी घेण्यात येत आहे.