स्वीकृती केंद्र, कृत्रिम तलाव, खाडी परिसरातील नियाेजनाची आयु्नतांकडून पाहणी श्री गणेश विसर्जनासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने शहरात चार ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहेत.अनेक नागरिक खाडीतही गणेश विसर्जन करतात.महापालिकेने मूर्ती संकलनासाठीही विशेष व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणांची महापालिका आयुक्त दिलीप ढाेले यांनी नुकतीच पाहणी करून प्रशासनास विविध सूचना केल्या.मिरा-भाईंदर शहरातील तलावांत दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यात मुख्यतः पीओपी मूर्तींचा समावेश असताे. पीओपी मूर्ती विसर्जित केल्याने पाण्यात रसायने मिसळून तलावातील पाणी दूषित हाेते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हाेऊ नये, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात 4 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून, तेथे सुशाेभीकरण करण्यात आले आहे. मिरा राेड (पूर्व), टाऊन पार्क (शिवार गार्डन), भाईंदर (प) सुभाषचंद्र बाेस मैदान, भाईंदर (पूर्व), नवघर एस. एन. काॅलेज, मिरा राेड (पूर्व), जाॅगर्स पार्क (स्मशान भूमी जवळ) या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.
आयुक्त ढाेले यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत जेसल पार्क खाडी, मूर्ती स्वीकृती केंद्र, तसेच कृत्रिम तलावाची पाहणी केली. खाडी परिसरात, तसेच स्वीकृती केंद्र आणि कृत्रिम तलाव परिसरात याेग्य ती उपाययाेजना करून विसर्जनाच्या दिवशी गर्दी हाेणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच, मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना नेमणूक करण्यात आलेल्या सर्व पालिका अधिकाऱ्यांनी याेग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.नागरिकांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी जवळच्या परिसरातील कुंडात किंवा कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. पालिकेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्वीकृती केंद्रावर, खाडी परिसरात, तसेच कृत्रिम तलाव परिसरात नागरिकांनी नाहक गर्दी करून काेराेना नियमांचे उल्लंघन करू नये. तसेच, काेविडच्या सर्व नियमांचे पालन करून यंदाच्या गणेशाेत्सवात नागरिकांनी शांततेत विसर्जन पार पाडावे. विसर्जनस्थळी आराेग्य सेवा, पाेलिस प्रशासन, अग्निशमन सेवा व पालिका कर्मचाऱ्यांचा फाैजफाटा सज्ज करण्यात आला आहे.