छत्तीसगढ राज्यातील नक्षलवादाने त्रस्त दंतेवाडा जिल्ह्यातील घनदाट जंगलात असलेल्या अतिशय उंच डोंगरावर परशुराम अवतारात श्रीगणेशाची मूर्ती स्वत: परशुरामांनी स्थापन केली आहे.
त्यामुळे ४००० फूट उंचीच्या ढोलकल डोंगरावर विराजमान गणेशाला परशू गणेश असे म्हणतात. या ढोलकल डोंगराच्या पायथ्याशी फरसा नावाचे गाव आहे.
या परशू गणेशाच्या संदर्भात अशी दंतकथा प्रचलित आहे की, या डोंगरावर भगवान परशुराम आणि श्रीगणेशा दरम्यान भयंकर युद्ध झाले. त्यात भगवान परशुरामांनी त्यांचे शस्त्र परशूने गणेशावर प्रहार केला. त्यामुळे श्रीगणेशाचा एक दात तुटला.
युद्ध संपल्यावर भगवान परशुरामांनी याच ठिकाणी गणपतीची भव्य मूर्ती स्थापन करून सुंदर मंदिर बांधले. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करीत आजही ही मूर्ती या डोंगरावर विराजमान आहे.